- आशिष सिंहमुंबई : जिहादसाठी प्रत्येक मुस्लिमाने एक वेळ तरी तुरुंगात जायला हवे. तरच प्रत्येक मुजाहिदीन जिहादचा सच्चा शिपाई बनू शकतो, असे भडकावू आवाहन करीत तरुणांना हिंसक कारवायांचे प्रशिक्षण देणाऱ्या एका संघटनेची तसेच तिच्या स्लीपर सेलची माहिती तपासयंत्रणांच्या हाती आली आहे. या अहवालाची प्रत ‘लोकमत’च्या हाती आली आहे.
अलीकडेच औरंगाबाद, परभणी, नांदेडसह भिवंडी आणि पडघा परिसरात चाललेल्या संशयास्पद हालचालींची माहिती घेत असताना तपास यंत्रणांच्या हाती या संघटनेची माहिती आली. तरुणांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना धर्मरक्षक संबाेधत दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याचे प्रकार या संघटनेकडून सुरू असल्याचे सांगण्यात येते. अहवालानुसार या संघटनेच्या हितचिंतकाने देशात इस्लामिक शासन आणि शरीयत कायदा कायम ठेवण्याचे आवाहन करण्यासाठी गुप्तपणे शिबिरे आयोजित करून गरजू तरुणांची दिशाभूल करण्याच्या कारवाया चालवल्या आहेत. या मुजाहिदीनांच्या मनातून तुरुंगाची भीती कमी करण्यासाठी या तरुणांनी कोणत्याही गुन्ह्याखाली तुरुंगात जावे. तेथे असे वर्तन करावे की काही काळ अंडा सेलमध्ये ठेवले गेले पाहिजे. त्यामुळे मनोधैर्य वाढेल, अशा सूचना शिबिरात केल्या जात आहेत.
या संघटनेचा प्रमुख पूर्वी सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या संघटनांचा हितचिंतक होता. काही वर्षांपूर्वी त्याने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग घेतला होता. अनेक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर दोन वर्षांपूर्वी पुराव्याअभावी त्याची तुरुंगातून सुटका झाली. फार्मसीचा पदवीधर असलेला दहशतवादी आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगून तरुणांची माथी भडकवतो. विशेष म्हणजे त्याची भाषणे ऐकण्यासाठी दूरवरून श्रोते येतात. बाहेरच्या देशातून निधी येणाऱ्या अनेक संघटनांशी त्याचे संबंध आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे.काही दिवसांपूर्वी या संघटनेने औरंगाबाद येथे गुप्तपणे शिबिर भरवून हिंसा करण्याचे आवाहन तरुणांना केले होते. ही संघटना आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील मुस्लिमांना आर्थिक मदत करताना भारतातील कायदे मानण्यास नकार देण्याच्या सूचना करते, असे या अहवालात म्हटले आहे.
निधीची माहिती तपास यंत्रणांच्या रडारवर या संघटनेची तसेच तिच्या हितचिंतकांच्या कारवाया तसेच त्यांना मिळणाऱ्या निधीची माहिती तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. याशिवाय गुप्तपणे घेण्यात येणाऱ्या शिबिरांचा तपशील तपासण्यात येत आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीतील तुरुंगांमध्ये बंदिस्त असलेल्या संघटनेच्या हितचिंतकांवरही नजर ठेवण्यात येत आहे. सारे पुरावे हाती आल्यावर या संघटनेवर कारवाई होऊन प्रतिबंधही घातला जाऊ शकतो, असे तपास यंत्रणेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.