ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - मुंबईसह देशातील अतिमहत्त्वाच्या शहरांमध्ये हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 'जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाकडून हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी देशात घातपात घडवण्याचा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर, खबरदारी म्हणून गुप्तचर विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
आणखी बातम्या
रेल्वे स्टेशन, मॉल, अशी गर्दीच्या ठिकाणे टार्गेट केली जाऊ शकतात, अशी शक्यताही गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. यामुळे अतिसंवेदनशील ठिकाणांची पाहणीही देखील करण्यात आली आहे. सतर्कता म्हणून एनएसजी कमांडो टीमही प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.
आणखी बातम्या
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. याचाच बदला घेण्यासाठी पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळली आहे. तसेच सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या सीमारेषेवरही कुरापती वाढल्या आहेत.