मुंबई : सतत पाठपुरावा करूनही कामे होत नसल्याने वैतागलेल्या तिघा जणांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचा दिवस साधून मंगळवारी मंत्रालयात आलेल्या तीन जणांनी मुख्यमंत्र्यांचे दालन असलेल्या सहाव्या मजल्यावर येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हे प्रकार घडले तेव्हा मुख्यमंत्री आपल्या दालनात होते. औरंगाबाद येथील शेतकरी दिलीप मोरे यांच्या भावाची २०११ मध्ये हत्या झाली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी त्याची आत्महत्या म्हणून नोंद केली होती. त्याविरोधात मोरे सतत मंत्रालयात चकरा मारत होते. आजही ते याच कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटू इच्छित होते. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांनी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी आत न सोडल्यामुळे मोरे यांनी बाटलीतून आणलेल्या विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मोरेना रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाल्याने ते बेशुद्ध होऊन खुर्चीतून खाली पडले. काही मिनिटांच्या फरकाने दुसरी घटना घडली. गेली वर्षभर पाठपुरावा कॅनही आपले काम होत नसल्याने वैतागलेले मुलुंड येथिल दिनेश पिडयाळ या युवकाने मुख्यमंत्री दालनातच झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. जळगावचा हिरालाल प्रभाकर ढाकणे शिष्यवृत्ती मिळत नसल्याची तक्रार घेऊन मुख्यमंत्री कार्यालयात आला होता. मात्र त्याचीही निराशा झाल्याने त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. (विशेष प्रतिनिधी)- लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे मंत्रालय हादरुन गेले असून लोकांची कामे तातडीने करण्याऐवजी मंत्रालयातील अभ्यंगतांची गर्दी कशी कमी करता येईल, यावरच अधिकारी चर्चा करताना दिसले.
मंत्रालयात तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: June 15, 2016 5:14 AM