ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 30 - कविटगाव (ता. करमाळा) येथे दरोडा घालून ट्रकसह हरभऱ्याचा माल पळविणारी टोळी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी जेरबंद केली़, या टोळीकडून ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, १८ जानेवारी २०१७ राजी दीपक लालसिंग चव्हाण (वय २५, रा. ढेकरी कसरावत, जि. खाटगोंद, रा. मध्य प्रदेश) हा मालट्रक क्रमांक एमपी ०९ एचएच ७८७१ मधून २६ टन हरभऱ्याची २५८ पोली गदग ते इंदौर असे घेऊन जात होता. याचवेळी कविटगाव (ता. करमाळा) येथे ४ अनोळखी चोरट्यांनी या ट्रकला अडवून दीपक चव्हाण व गाडीच्या क्लीनरला ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्या ताब्यातील ट्रकसह हरभऱ्याचा माल पळवून नेला. याबाबत दीपक चव्हाण यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली होती़ पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण, पोसई रियाज शेख व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास कामास सुरुवात केली़. तपासकामी पंढरपूर भागात फिरत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, सचिन बनसोडे, बंड्या माशाळ व इतर साथीदार यांनी मिळून हा ट्रक पळवून माल चोरला असल्याची माहिती मिळाली. याशिवाय हा माल नारायणचिंचोळी (ता. पंढरपूर) येथील प्रशांत नलवडे यांच्या वस्तीवर लपवून ठेवला होता. शिवाय हा माल विक्रीसाठी सचिन बनसोडे व प्रशांत नलवडे हे दोघे पंढरपूर मार्केट यार्डासमोर थांबले होते. या मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंढरपूर बाजार समितीसमोर प्रशांत श्रीमंत नलवडे व सचिन संजय बनसोडे या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडून माहिती घेतली असता दोघांनी गुन्हा कबूल केला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण, पोसई रियाज शेख, पोह नारायण गोलेकर, गोरखनाथ गांगुर्डे, ख्वाजा मुजावर, पोना मोहन मनसावले, अरुण केंद्रे, सचिन मागाडे, सागर शिंदे, इस्माईल शेख, राहुल सुरवसे, दीपक जाधव यांनी बजावली आहे.
३० लाखांच्या मुद्देमालासह दरोडेखोर टोळी जेरबंद
By admin | Published: January 30, 2017 3:36 PM