पुणे : आरटीओ कार्यालयामध्ये शिकाऊ लायसेन्स काढल्यानंतर पक्क्या लायसेन्ससाठी अपॉइंटमेंट मिळत नसल्याने अनेक उमेदवारांना पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया पार पाडावी लागत होती. आॅनलाइन प्रक्रियेतील ही त्रुटी दूर करण्याकरिता शिकाऊ लायसेन्स मुदतीच्या शेवटच्या आठवड्यात अशा उमेदवारांची विनाअपॉइंटमेंटही चाचणी घेण्यात येईल, असे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने काढले आहेत.राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये शिकाऊ तसेच पक्क्या लायसेन्ससाठी आॅनलाइन प्रक्रियेचा अवलंब करण्यात येत आहे. शिकाऊ तसेच पक्क्या लायसेन्ससाठी चाचणी देण्याकरिता आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरून अपॉइंटमेंट घ्यावी लागते. लायसेन्स मिळाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत पक्के लायसेन्स काढणे बंधनकारक आहे. मात्र, पक्क्या लायसेन्ससाठी ६ महिन्यांनंतरची अपॉइंटमेंट मिळत असल्याने उमेदवारांचे शिकाऊ लायसेन्स बाद होत होते. त्यांना पुन्हा लायसेन्सची प्रक्रिया करावी लागत होती.आॅनलाइन प्रक्रियेतील या त्रुटीविरुद्ध आरटीओकडे असंख्य तक्रारी येत होत्या, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्क्या लायसेन्ससाठी अपॉइंटमेंट घेतली असता ती शिकाऊ लायसेन्सच्या वैध मुदतीनंतर मिळाल्यास त्यांना विनाअपॉइंटमेंट चाचणी देण्याच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. शिकाऊ लायसेन्सची मुदत संपण्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांची चाचणी घेतली जाणार आहे. त्याकरिता त्यांना वैध मुदतीनंतरची अपॉइंटमेंट मिळाल्याबाबतचा पुरावा सादर करावा लागणार आहे.शिकाऊ लायसेन्सची मुदत संपण्याच्या शेवटच्या महिन्यात ज्या उमेदवारांनी अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांना जर वैध मुदतीनंतरची अपॉइंटमेंट मिळाली असेल तर त्यांना ही सुविधा मिळणार नाही, असे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती कारवाई कार्यालय प्रमुखांनी करावी असे आदेश परिवहन आयुक्त यांनी काढले आहेत.
लायसेन्ससाठी अपॉइंटमेंटविनाही देता येणार चाचणी
By admin | Published: August 05, 2015 3:07 AM