मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांनी खाजगी सचिव (पीएस), स्वीय सहायक (पीए), विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) यांची नियुक्ती केली आहे, त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.
उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या आदेशावरून त्यांच्या कार्यालयात पीएस, पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची यादी सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी जारी केली आहे.
मात्र, ही यादी जारी करताना या अधिकाऱ्यांची सखोल पडताळणी केली जाणार असून, या पडताळणी अहवालाच्या अधीन राहूनच या नियुक्त्या कायम केल्या जाणार आहेत.
सेवाविषयक माहिती, विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, वित्त विभागाची मान्यता, तसेच बाहेरील उमेदवार यांची वैयक्तिक माहिती, कागदपत्रे पडताळणी (वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता), तसेच चारित्र्य पडताळणी अहवाल तपासला जाणार आहे.