पुणे : खासगी क्लासवाल्यांच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे बारावीचे ४१ विद्यार्थी भूगोलाच्या पेपरला मुकले. या घटनेची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दखल घेतली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मोबाइल एसएमएसद्वारे परीक्षेचे वेळापत्रक पाठविण्याचा प्रस्ताव त्यांच्या विचाराधीन आहे. शहरातील खासगी क्लासेसवाले जाहिरात करण्यासाठी पत्रकांवर दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक छापून विद्यार्थ्यांना वाटतात. नुकतेच एका क्लासेसने चुकीचे वेळापत्रक छापल्यामुळे ते बघून परीक्षा देणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांवर भूगोल विषयाच्या पेपरला मुकावे लागले. याची दखल घेत राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांच्याशी चर्चा केली. या वेळी राज्यातील दहावी व बारावी परीक्षेदरम्यान असे गंभीर प्रकार होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भर दिला जाणार आहे. दहावी व बारावी परीक्षा फॉर्म भरताना संबंधित परीक्षार्थी विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे मोबाइल नंबर मंडळाने भरून घ्यावेत आणि परीक्षेचे वेळापत्रक एसएमएसद्वारे त्यांना कळवावे, असा प्रस्ताव पुढे आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यासाठी मंडळ प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
परीक्षेचे वेळापत्रक एसएमएसने मिळणार
By admin | Published: March 12, 2016 4:17 AM