मुंबई : तीस वर्षांपूर्वी मुंबईतील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म केईएम रुग्णालयात झाला होता. ७ मार्च रोजी याच टेस्ट ट्युब बेबीने मुंबईतील जसलोक रुग्णालयात सकाळी १०.३६ मिनिटांनी एका मुलाला जन्म दिला. इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. इंदिरा हिंदुजा यांनीच तिची प्रसूती केली.देशात ३० वर्षांपूर्वी ‘टेस्ट ट्युब बेबी’चे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. त्या काळात मुंबईतील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा म्हणजेच हर्षा छावडाचा ६ आॅगस्ट १९८६ रोजी जन्म झाला. तो आमच्यासाठी खूपच आनंदाचा क्षण होता. तसाच आनंद आजही झाला आहे. टेस्ट ट्युब बेबीदेखील सामान्यपणे आयुष्य जगू शकतात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. सकाळी १० वाजून ३६ मिनिटे ३० सेकंदांनी हर्षाने मुलाला जन्म दिला. बाळाचे वजन ३.१८ किलो इतके आहे. बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. हिंदुजा यांनी स्पष्ट केले. एक वर्षापूर्वी हर्षाचा व्यावसायिक दिव्यपाल शहा यांच्याशी विवाह झाला होता. हर्षा मुंबईतील एका कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे. हर्षाची आई मणीबेन यांना मूल हवेच होते. पण, त्यांना गर्भधारणा होत नव्हती. टेस्ट ट्युब बेबीची गर्भधारणा झाल्याचे जेव्हा कळले, तेव्हा केईएम रुग्णालयात एक आंतरराष्ट्रीय परिषद सुरू होती. त्या वेळी परिषद थांबवून याची घोषणा करण्यात आली होती. हर्षाच्या जन्मानंतर अनेकांनी रुग्णालयात येऊन अभिनंदन केले होते. त्या वेळी खूप आनंद झाला होता, असे डॉ. हिंदुजा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हर्षाचे सिझेरिअन झाले आहे. हर्षाची गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीने झाली होती. तिच्या गर्भारपणात कोणत्याही प्रकारची गुंतागुंत नव्हती. हर्षाच्या उदाहरणामुळे अजूनही काही जणांच्या मनात असलेले सर्व प्रश्न दूर होतील. टेस्ट ट्युब बेबी सामान्यपणे आयुष्य जगू शकतात. गेल्या ३० वर्षांच्या काळात आम्ही तिच्या संपर्कात होतो. त्यामुळे आमच्यात एक वेगळेच नाते आहे. तिच्या मुलाच्या जन्मावेळी आम्ही तिथे होतो. हा सर्वांसाठीच एक आनंदाचा क्षण आहे. हर्षानंतर १५ हजार टेस्ट ट्युब बेबींचा जन्म झाला आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
टेस्ट ट्युब बेबी आता बनली ‘आई’
By admin | Published: March 08, 2016 3:14 AM