अविनाश साबापुरेयवतमाळ : शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण करण्याचा प्रताप केल्याप्रकरणी अटकेतील तुकाराम सुपेने टीईटीतील या गैरप्रकाराचे ‘छुपे’ मार्ग दोन वर्षांपूर्वीच ‘इच्छुकां’साठी मोकळे केल्याची बाब पुढे येत आहे. आठवडाभरापूर्वी परीक्षा परिषदेनेच दिलेल्या माहितीतून या प्रकारावर शिक्कामोर्तब झाले.
१४ जानेवारी २०१९ रोजी सुपे याने आदेश काढून टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीच्या नावाखाली मागविली होती. त्यासाठी सर्व शिक्षण उपसंचालकांवर कामगिरी सोपविण्यात आली. २०१३ पासून २०१८ पर्यंत जे शिक्षक सेवेत रुजू झाले व ज्यांनी टीईटी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र शिक्षण विभागाला सादर केले, त्यातील बहुतांश प्रमाणपत्रे बनावट असल्याचा बनाव सुपेंनी केला होता. ७० हजार उमेदवार टीईटी उत्तीर्ण झालेले असताना किती प्रमाणपत्रांची पडताळणी केली, हे अद्याप जाहीर नाही. पडताळणीच्या आडून आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.
४९३ टीईटी प्रमाणपत्रे खरी की खोटी?
- अनिल सोनवणे या शिक्षकाने शालेय शिक्षण विभाग व परीक्षा परिषदेला प्रमाणपत्रांच्या पडताळणीबाबत माहिती अधिकारात माहिती विचारली होती.
- दोन वर्षांत पडताळणीसाठी आलेल्या टीईटी प्रमाणपत्रांची संख्या केवळ ४९३ असल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली.
- परंतु या प्रमाणपत्रांची पडताळणी झाली किंवा नाही, ती खरी आहेत की खोटी, याबाबत परिषदेने माहिती दडविली.