ऑनलाइन लोकमत/गणेश मापारी
खामगाव, दि. 08 - सोयाबीन विक्रीसाठी आणणा-या शेतक-यांची बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना शासकीय खरेदी केंद्राकडे मात्र शेतक-यांनी पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रावर केवळ २११ क्विंटल सोयाबीन खरेदी झालेली आहे.
अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणा-या शेतक-यांवर यावर्षीही शेतमालाच्या कमी भावाचे संकट ओढवले आहे. सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाºया शेतकºयांना यावर्षी पावसाने साथ दिली. त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न समाधानकारक झाले आहे. मात्र सोयाबीन पिकाला चांगले भाव नसल्याने शेतकरीवर्गामध्ये नाराजी आहे. शासनाने २ हजार ६७५ रुपये प्रतिक्विंटल असा हमीदर सोयाबीनसाठी जाहीर केला आहे. तसेच नाफेडच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करणाºया शेतकºयांना १०० रुपये बोनससह एकूण २७७५ प्रतिक्विंटल भाव देण्यात येत आहे. मात्र विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनमध्ये आद्रतेचे प्रमाण १२ टक्केपेक्षा जास्त असल्यास शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी केली जात नाही. त्याचप्रमाणे शेतकºयांना ७/१२ व इतर कागदपत्रे सोबत आणावी लागतात. सोयाबीनची विक्री केल्यानंतर लगेच पैसे मिळत नसून तीन-चार दिवसानंतर खरेदी विक्री संघाकडून धनादेश मिळतो. यासर्व त्रासदायक प्रकारामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीनच विकलेले नाही. खामगाव, चिखली आणि देऊळगाव राजा या तीन शासकीय खरेदी केंद्रांवर केवळ २११ क्विंटल सोयाबीनची खरेदी २७ आॅक्टोबर पासून ७ नोव्हेंबर पर्यंत झालेली आहे. त्यामुळे नाफेडने सुध्दा बाजार समित्यांप्रमाणे सरसकट सोयाबीनची खरेदी करावी आणि किमान ३ हजार रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे सोयाबीनला भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकºयांकडून केल्या जात आहे.
दोन खरेदी केंद्रांवर ‘भोपळा’
सोयाबीन खरेदी करण्यासाठी पाच बाजार समित्यांमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर आणि मलकापूर या पाच ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र आहेत. खामगाव, चिखली आणि देऊळगाव राजा याठिकाणी सोयाबीन खरेदीची सुरुवात तरी झाली आहे. मात्र मेहकर आणि मलकापूर या दोन शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीचा अद्याप श्रीगणेशा सुध्दा झाला नाही.
नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकºयांना सोयाबीनला प्रतिक्विंटल २ हजार ७७५ रुपये भाव देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांनी बाजार समित्यांमधील शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करावी.
- पी. एस. शिंगणे
जिल्हा मार्केटींग अधिकारी
बुलडाणा