वाशिम : दरवर्षी विदर्भातील विविध धरणांवर तसेच अभयारण्यांमध्ये विदेशातून हजारो स्थलांतरित पक्षी येतात; मात्र या वर्षी विदर्भात पुरेशी थंडीच नसल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी पाठ फिरविल्याचे पक्षीमित्रांच्या निदर्शनास आले आहे. हिवाळ्यात उत्तर ध्रुवावरील पक्ष्यांना विदर्भात अनुकूल अधिवास मिळतो. पाणपक्षी व जंगलात राहणाऱ्या पक्ष्यांना मुबलक अन्न उपलब्ध असते. चार महिने वास्तव्य केल्यानंतर हे पक्षी परत जातात. विदर्भात दरवर्षी युरोप, मंगोलिया, सायबेरिया येथून ७० ते ८० प्रजातींचे पक्षी स्थलांतर करतात. यामध्ये प्रामुख्याने बारहेडेड बूथ, शॉवेलर, पिन्टेल, टफ्टेड डक, कॉमन पोचार्ड या पक्ष्यांचा समावेश आहे. या वर्षी मात्र डिसेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू झाला, तरी विदर्भात थंडी पडलेली नाही. जलसाठाही कमी आहे. यंदा कमी पक्षी आल्याचे पक्षीमित्र तथा वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन समितीचे मिलिंद सावदेकर सांगितले. दरवर्षी वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी तलावावर फ्लेमिंगो पक्षी स्थलांतर करून येथे पंधरा दिवस वास्तव्य करतात. गतवर्षी येथे १५६ फ्लेमिंगो पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती. यावर्षी मात्र केवळ आठच पक्षी निदर्शनास आले.
स्थलांतरित पक्ष्यांची विदर्भाकडे पाठ
By admin | Published: December 25, 2015 3:46 AM