सोलापूर : जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी शहरातून ४५ प्रकारच्या बनावट विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स, झाकणं, रि-बॉटलिंग साहित्य, मशीन असा सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दमानी नगरात मागील काही दिवसांपासून बनावट दारूची निर्मिती होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाचे अधीक्षक सागर धोमकर व त्यांच्या पथकाने हा छापा टाकला. या प्रकरणी प्रमोद नागनाथ जाधव (वय ३५), आप्पा विठ्ठल लवटे (वय ४८) या दोघांना ताब्यात घेतले आहे. मध्य प्रदेशात दारू अत्यंत स्वस्तात उपलब्ध होते. तेथील दारू महाराष्ट्रात आणून विक्री करण्याला बंदी आहे. दोघे आरोपी मध्य प्रदेशातून प्लास्टीकच्या बाटलीमधून दारू सोलापुरात आणत. मुंबई-पुणे येथून नामांकित कंपनीच्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांची खरेदी करून त्यात ही दारू भरून विकत असत. आरोपी जाधव हा स्वत:च्या घरीच गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा करीत होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. (प्रतिनिधी)
बनावट मद्यसाठा जप्त
By admin | Published: February 17, 2017 2:58 AM