नागपूर पोलिसांचा सापळा : चौघांना अटकवर्धा/तुमसर : वर्धा रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या एका युवकाकडून गुरुवारी सकाळी ११ वाजता तब्बल १ लाख ९८ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा आणि तुमसरमध्ये बनावट नोटा छपाईच्या यंत्रासह अटक करण्यात आली. नागपूर एटीएसच्या पोलिसांनी सापळा रचून वर्धा शहर पोलीस व तुमसर पोलिसांच्या मदतीने बनावट नोटांचे रॅकेट उघड केले. वर्धेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या शेख आसिफ शेख उस्मान (रा. मधुकरनगर) याला हॉटेलमध्ये आणि तुमसर येथील देव्हाडी येथे बंटी दवारे (२८) रा. गांधी वॉर्ड, छोटू मेश्राम (३०) रा. स्टेशनटोली व विजय लिल्हारे (३०) रा. नेहरू वॉर्ड यांना नकली नोटांसह अटक करण्यात आली. या प्रकरणाचे पुसद कनेक्शन असावे, असा संशय तपास अधिकाऱ्यांना असल्याने एटीएस व वर्धा पोलीस आरोपीला घेऊन पुसदला रवाना झाले. वर्धा रेल्वे स्थानकापासून काही फर्लांगावर असलेल्या न्यू सत्कार हॉटेलमधील एका सूटमध्ये एक इसम संशयितरीत्या राहात असून त्याच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये बनावट नोटा असल्याची पक्की माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक मरघडे यांना मिळाली होती. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक एन.एस. रामटेके व पोलीस हवालदार जांभूळकर, गजानन कठाणे, मनोहर मुडे, सचिन वाटखेडे, संजय राठोड, चंदू खोडे यांनी त्या हॉटेलात धाड घालून शेख आसिफ शेख उस्मान याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याजवळील बॅगमध्ये १ लाख ९८ हजार ५०० रुपये किमतीच्या एकूण ३८५ नोटा आढळून आल्या. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कलम ४८९ (ब),(क)भादंविच्या अन्वये गुन्हा नोंदवून अटकेची कारवाई केली. तुमसर येथील टोळीने नागपूर येथे नकली नोटा चलनात आणल्या होत्या. त्याची सत्यता लक्षात आल्यावर एटीएसने सापळा रचला. यात नागपूर येथील एकाला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने बंटी दवारे याचे नाव सांगितले. तुमसर रोड येथे रेल्वे स्थानक असून मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागून आहेत. नागपूर शहरात किती नकली नोटांचा वापर करण्यात आला, याची माहिती चौकशी अधिकारी घेत आहेत. या टोळीत किती जणांचा समावेश आहे, या टोळीचे नेटवर्क कुठपर्यंत आहे, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई करणारे पोलीस उपनिरीक्षक मंगेश देसाई यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. या कारवाईची शहानिशा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)२० हजारात एक लाख रूपयेतुमसरातील टोळी २० हजारात एक लाख रुपयाच्या बनावट नोटा विकत होते. या नोटांची छपाई ते घरीच करायचे. बॉन्ड पेपरचा या नोटा छपाईकरिता वापर करीत होते. ग्रामीण व शहरी भागात जुगार अड्ड्यांवर या नकली नोटांचा वापर करण्यात येत होता. वर्धेत बनावट नोटा पकडल्यावर त्या नोटा सदर युवकाने कुठून आणल्या, तो त्या घेऊन कुठे जात होता, याबाबत अद्याप कुठलाही खुलासा झाला नाही. त्या अनुषंगाने अधिक चौकशीकरिता पोलीस आरोपीला घेऊन पुसदला रवाना झाले आहेत.
वर्धा-तुमसरमध्ये बनावट नोटा जप्त
By admin | Published: July 25, 2014 12:46 AM