ठाणे- खंडणी प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरसह तिघांना रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी पोलीस कोठडीत आहे. ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणी विरोधी पथकाने 19 सप्टेंबर रोजी अटक केली. त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख आणि इसरार जमीर अली सैयद यांनाही पोलिसांनी अटक केली होती.आरोपींना आधी आठ दिवसांची आणि दुस-यांदा चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. रविवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिन्ही आरोपींना न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी पंकज गंगर सध्या पोलीस कोठडीत आहे.इक्बाल कासकर आणि छोटा शकीलला तो अर्थपुरवठादार असल्याचा पोलिसांना संशय आहे. ठाणे कारागृहात इक्बाल कासकरला कडक सुरक्षेत ठेवले जाईल, असे कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी सांगितले. इक्बाल कासकरच्या टोळीतल्या आणखी काही आरोपींचा खंडणी विरोधी पथकाकडून शोध सुरू आहे. त्यापैकी दोन आरोपी बिहारचे असून, त्यांचा वापर व्यापा-यांना धमकावण्यासाठी केल्याचा पोलिसांना संशय आहे.
खंडणी प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरसह तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 7:28 PM