राष्ट्रपतिपदासाठी मुर्मू यांना ठाकरेंचा पाठिंबा, काँग्रेस म्हणते शिवसेनेची भूमिका 'अनाकलनीय'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 05:40 AM2022-07-13T05:40:59+5:302022-07-13T05:42:20+5:30
आपण कोणाच्याही दबावात येऊन हा निर्णय घेतलेला नाही, असे ठाकरे यांनी केलं स्पष्ट.
मुंबई : राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात आणि त्यापूर्वीही शिवसेनेचा कट्टर विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केला. आपण कोणाच्याही दबावात येऊन हा निर्णय घेतलेला नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना खासदारांची ठाकरे यांनी सोमवारी बैठक घेतली असता त्या बैठकीत बहुतेक खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची जोरदार मागणी ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे आता ठाकरे हे मुर्मू यांना पाठिंबा देणार, असे म्हटले जात होते. स्वत: ठाकरे यांनी मंगळवारी तशी घोषणा केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यात दिल्लीत घेतलेल्या बैठकीला शिवसेनेतर्फे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी, असा आग्रह शिवसेनेने धरला होता.
२० जूनच्या रात्री शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे नंतर ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यातच शिवसेनेचे १२ खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याचेही वृत्त आले. खासदारांनी ठाकरे यांच्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यास दबाव आणला. राष्ट्रपतिपद हे राजकारणापलीकडचे असते. मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे होत नाही, असे खा. संजय राऊत म्हणाले.
ठाकरे यांनी दिली पाठिंब्याची कारणे
- खासदारांचा माझ्यावर दबाव नव्हता. तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे खासदारांनी मला सांगितले होते.
- तथापि, शिवसेनेतीलच आदिवासी समाजाचे नेते, कार्यकर्ते यांनी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती.
- आदिवासी समाजाच्या एका महिलेला देशाचे सर्वोच्च पद मिळते आहे तेव्हा आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा, असा आग्रह शिवसेनेंतर्गत काम करणारी एकलव्य सेना, आ. आमशा पाडवी, माजी आमदार निर्मला गावित यांनी धरला.
- राष्ट्रपती पद हे सर्वोच्च आहे. याआधीही आम्ही प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे शिवसेना कधीही कोत्या मनाने वागलेली नाही, असे ठाकरे म्हणाले.
शिवसेनेची भूमिका अनाकलनीय : काँग्रेस
शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र, या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले अशा परिस्थितीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे.
शिवसेना महाविकास आघाडीत आहे; पण मुर्मू यांना पाठिंबा देताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केली नाही, या शब्दांत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रपती निवडणुकीवरून महाविकास आघाडीत फूट
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील उमेदवारांना पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडीमध्ये फूट असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. शिवसेनेने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. काँग्रेस व राष्ट्रवादीने या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे.
राजकीय वर्तुळात आश्चर्य
भाजपसोबत एनडीएमध्ये असताना काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई पाटील व नंतर प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने आज भाजपशी अत्यंत कटू संबंध असतानाही मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.