मुंबई: यंदाच्या दिवाळीत राज्यात फटाक्यांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले आहेत. वायू प्रदूषणात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम कोरोना रुग्णांवर होतो. त्यामुळे आरोग्य विभाग फटाकेमुक्त दिवाळीसाठी आग्रही आहे. प्रदूषण वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. कोरोनाचा आजार थेट श्वासाशीच संबंधित असल्यानं यंदा राज्यात फटाके विक्रीवर बंदी घातली जाऊ शकते. याबद्दलचा प्रस्ताव आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे.फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होते. त्याचा त्रास कोरोना रुग्णांना होऊ शकतो. त्यामुळेच यंदाच्या दिवाळीत फटाके विक्रीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. फटाकेमुक्त दिवाळीसाठी राज्याचा आरोग्य विभाग आग्रही असल्याचं समजतं. त्यामुळेच आरोग्य विभागानं याबद्दलचा प्रस्ताव तयार केला आहे. तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास यंदा राज्यात फटाके विक्रीवर बंदी असेल.कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्ससोबत फटाकेमुक्त दिवाळीबद्दल चर्चा सुरू आहे. यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी, यासाठी राजेश टोपे प्रयत्नशील आहेत. तसे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत. 'दिवाळीचा सण जवळ आला आहे. कोरोनाचं संकट असल्यानं यंदाची दिवाळी फटाकेमुक्त कशी करता येईल, याचा विचार आपण करायला हवा. यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाकडे आग्रह धरणार आहे,' असं टोपे म्हणाले.
राजस्थान, सिक्कीम, ओदिशात फटाक्यांवर बंदीकोरोना संकट आणि दिवाळीच्या काळात प्रदूषणामुळे होणारी वाढ लक्षात घेता काही राज्यांनी फटाकेबंदीचा निर्णय घेतला आहे. राजस्थान, सिक्कीम, ओदिशा सरकारनं फटाक्यांवर बंदी आणली आहे. तर दिल्लीनं पर्यावरणपूरक फटाक्यांवर भर दिला आहे.कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डेथ ऑडीट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, राज्य साथरोग नियंत्रण तक्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी यावेळी चर्चा झाली. ज्या रुग्णालयांमध्ये मृत्यू दर अधिक आहे त्याठिकाणी रुग्णालयस्तरावरच डेथ ऑडिट कमिटी नेमून शासनाला अहवाल देण्याचे यावेळी तज्ञांनी संगितले.