मुंबई – शहरात १०० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. देशात असा रेकॉर्ड बनवण्यात मुंबईत एक नंबरला आहे. मुंबईत ६५ टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्र लसीकरणाच्या मोहिमेत देशात अग्रेसर आहे. परंतु औरंगाबादसारख्या काही जिल्ह्यात लसीकरणाचा वेग धीम्या गतीचा आहे. लसीकरणाचा वेग कमी असलेल्यांमध्ये मुस्लीम लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत जागरुकता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानची(Salman Khan) मदत घेण्याचा विचार करत आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास ३५ टक्के आहे. या आकड्यात वाढ करायची असेल आणि लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा असेल तर कोविशील्ड व्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची गरज आहे. याबाबत ठाकरे सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनाही कळवलं आहे असं राजेश टोपेंनी सांगितले.
कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी व्हावं
राजेश टोपे म्हणाले की, कोव्हॅक्सिन लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर २८ दिवसांचे आहे तर कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवस आहे. हे अंतर कमी केले जाऊ शकते का? यावर तज्ज्ञांकडून सल्ला घेतला जात आहे. यात IMCR आणि रिसर्च करणाऱ्या टीमची महत्त्वाची भूमिका असणार आहे. पुढील ३० नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकार १०० टक्के लोकांचा लसीचा पहिला डोस दिला जाईल यासाठी प्रयत्नशील आहे.
सध्या अडीच कोटी जनतेला लसीचा पहिला डोस देण्याचं बाकी आहे. लसीसाठी सक्ती कायद्यानुसार केली जाऊ शकत नाही. परंतु जनजागृती करणं गरजेचे आहे. त्यासाठी कायद्याची मदत कशी घेतली जाईल यावर राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला घेतला जात आहे. लोकांच्या मनात लसीकरणाबाबत जे काही गैरसमज आहेत ते निराधार आहेत. एका धार्मिक व्यक्तीला लसीची गरज नाही किंवा लस त्यांच्यासाठी हिताची नाही. हा अंधविश्वास आणि अज्ञान आहे. ते दूर होणं गरजेचे आहे. त्यासाठीच जनतेला लसीकरणाबाबत जागृत करायला हवं. म्हणून सलमान खानसारख्या सुपरस्टारची मदत घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.