मुंबई: वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने (Thackeray Government) राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. दरम्यान, या निर्णयानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार विरोध केला आहे.
'सरकारचे फक्त दारुला प्राधान्य''शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारुलाच. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या नशेत धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, असा घणाघात फडणवीसांनी केला.
'महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही'फडणवीस पुढे म्हणाले, 'पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त. दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी. महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही', अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले.
राज्य सरकारचा निर्णयमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात राज्यातील किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जे सुपर मार्केट 1 हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारने मुभा दिली आहे.
भाजपशासित राज्यात या निर्णयाला मंजुरी-नवाब मलिकबैठक संपल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 'महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन धोरण ठरवले आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवागनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे', असे ते म्हणाले. तसेच, राज्याच्या वाईन धोरणावर टीका करणाऱ्या भाजपाचाही नवाब मलिक यांनी यावेळी समाचार घेतला. 'गोव्यात आणि हिमाचलमध्येही भाजपाने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपाने वाईन विक्रीचे धोरण स्वीकारले आहे. इथे मात्र ते विरोध करत आहेत', असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.