मुंबई : ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले "वाटघाटी" झाल्या. वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते. तर दुसरीकडे घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धुप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत, वाटाघाटी करु शकत नाहीत, वाटा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरु आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा, आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवाल करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आज ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली.
आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी मुंबईतील वांद्रे येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातले थिअटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीतला एक राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करु असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करा, अन्यथा आम्ही नाव जाहीर करु, असा गर्भित इशाराही आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.
गोविंदा काय लादेन आहेत काय?काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बलाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टीचा काय महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या, जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता. म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आठवण करून देतो, ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तर तुम्ही म्हणाला होतात की, सचिन वाझे लादेन आहे काय? म्हणून आज आमचा सवाल आहे तुम्हाला, हे गोविंदा काय लादेन आहेत काय? ज्या पद्धतीने बलाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय म्हणून हा सवाल आम्ही तुम्हाला विचारतोय, असे आशिष शेलार म्हणाले.
आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या? माननीय मुख्यमंत्री महोदय, म्हणत आहेत, आमचा सणांना विरोध नाही आमचा करोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते मग मुंबईतले राज्यातले रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय? आज आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय केंद्राच्या पत्रात बार, पब इथे गर्दी होणार नाही असे म्हटलेय का? आणि म्हणून केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर, केंद्राने तुम्हाला सांगितलं होतं टेस्ट वाढवा, वाढवल्यात का? मृत्यूचे आकडे लपवू नका, काय केलेत? केंद्राने सांगितलं होतं की, लसी समप्रमाणात राज्यभर द्या, मग जालन्याला सगळ्यात जास्ती लसी का गेल्या? ठाण्याच्या महापौरांनी आणि तुमच्या पक्षाच्या विधानपरिषदेच्या आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या? केंद्राने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवकांचे लसीकरण संपूर्ण करा, अद्यापही हे झालेले नाही. केवळ सिलेक्टीव्ह राजकारण करू नका. सन 2019 पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, 'पहिले मंदिर बादमें सरकार' तर 2021 ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि 'पहिले मदिरालय बाद मे मंदिर!' असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.
'मुख्यमंत्र्यांनी हे 75 वेळा बोलावे!'स्वातंत्रता आंदोलनाबद्दल तर मुख्यमंत्र्यांनी बोलूच नये, अगोदर 75 वेळा हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे.. हा भारत स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे.. हे 75 वेळा बोलावे! असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
संजय राऊतांना अंतर्गत धोका असवाखा. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात, त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतेय.. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तरअंतर्गत धोका असवा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, असा टोला याबाबत विचारल्या प्रश्नावर आशिष शेलार यांनी लगावला.