मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ असलेल्या कारमध्ये महिन्याभरापूर्वी स्फोटकं सापडली आणि एकच खळबळ उडाली. यानंतर एकापाठोपाठ एक स्फोटकं घडामोडी सुरू झाल्या. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूलाच राहिले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्यानं मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष झालं. अखेर आज मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.मराठा समासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेला पुण्यातल्या शिवाजीनगर येथे येथे शासकीय जागा देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत झाला. या निर्णयानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळाचे आभार मानले. 'राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत 'सारथी' संस्थेला शिवाजीनगर, पुणे येथे शासकीय जागा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मंत्रिमंडळाचा आभारी आहे,' असं चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अशोक चव्हाण मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत.
मराठा समाजाला ठाकरे सरकारची खास भेट; कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 9:17 PM