मुंबईः विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी फेरबदल करण्यात आले असून, दिलीप वळसे-पाटलांची आता विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती. पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेर राज्यपालांनी दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली. तर दुसरीकडे उद्या महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणीही घेण्यात येणार आहे. नव्या सरकारची उद्या अग्निपरीक्षा असून, बहुमत चाचणीचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरेंच्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. तत्पूर्वी विधिमंडळ सचिवालयाच्या कार्यालयाने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाला पाठवली होती. यामध्ये यादीमध्ये भाजपाच्या तीन, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तीन आमदारांच्या नावांचा समावेश होता. यातून भाजपाच्या कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती झाली होती. त्यात फेरबदल करून त्यांच्याऐवजी दिलीप वळसे-पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे.आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील सलग सातव्यांदा विजयी झाले असून, त्यांनी विजयाचा षटकार पार केला आहे. 2009 ते 2014 या कालखंडात दिलीप वळसे-पाटील विधानसभेचे अध्यक्ष होते. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. त्यावेळी जनता दलाचे खासदार असलेले किसनराव बाणखेले यांचा तालुक्यावर प्रभाव होता. मात्र 1990च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून वळसे-पाटील यांनी बाणखेले यांचे गुरू अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पराभूत केले. तसेच आघाडी सरकारच्या काळात त्यांनी वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा विभागासारखी महत्त्वाचे मंत्रिपदं सांभाळली होती.