Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबत नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली असून, ठाकरे गटातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. राज्यभरातून एकनाथ शिंदेंना वाढत असलेला पाठिंबा ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, यातच आता आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक, विश्वासू निकटवर्तीय शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई महापालिकेवरील ईडीची कारवाई तसेच अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून १ जुलै रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. युवासेनेतील अंतर्गत राजकारणामुळे राहुल कनाल नाराज असल्याची माहिती मिळत आहे. राहुल कनाल यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. राहुल कनाल यांच्या पक्षप्रवेशावर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
राहुल कनाल शिंदे गटात गेल्यास आदित्य ठाकरेंना मोठा धक्का
अलीकडेच सिद्धेश कदम, अमेय घोले यांनीही युवासेनेला रामराम ठोकला होता. त्यात राहुल कनाल शिंदे गटात गेल्यास आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जाईल. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा जनाधार आणि विश्वास वाढत आहे. रोज एकनाथ शिंदे यांच्याबरोबर लोक जोडली जात आहेत. आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रवेश सुरु आहेत. येणाऱ्या काळातही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे प्रवेश सुरु राहणार आहेत. कारण, तळागळातील लोकांसाठी निर्णय घेण्याचे काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत, असे श्रीकांत शिंदेंनी सांगितले.
दरम्यान, ०१ जुलै रोजी विराट महामोर्चा काढण्यावर ठाकरे गट ठाम आहे. परंतु, पोलिसांकडून या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या मोर्चा विरोधात महायुती 'चोर मचाये शोर' प्रत्युत्तर मोर्चा काढणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजप, शिवसेना व रिपाइं म्हणून प्रथमच महायुतीतील सर्व पक्ष दिसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.