राहुल गांधींना दिलासा; आदित्य ठाकरेंचे थेट भाष्य, म्हणाले, “केंद्रात बसलेल्या सरकारला...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 05:05 PM2023-08-04T17:05:42+5:302023-08-04T17:08:57+5:30
Aaditya Thackeray: सत्यासाठी आम्ही लढत राहू शांत बसणार नाही, असा एल्गार आदित्य ठाकरे यांनी केला.
Aaditya Thackeray: मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने जी शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकीही परत मिळणार आहे. यावर, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
सत्यमेव जयते! कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही. राहुल गांधी यांच्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे, हे दिसून आले. चुकीच्या पद्धतीने दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. राहुल गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही यावर भाष्य केले.
सत्यासाठी आम्ही लढत राहू शांत बसणार नाही
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दिलासा योग्यच आहे. कारण आपल्या देशात कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. या प्रकरणात कुठे तरी काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या हे माझेच म्हणणे नाही तर हे प्रत्येकाला वाटत होते. सत्यासह उभे राहणे हे आता या देशात गुन्हा ठरु लागले आहे. म्हणजे केंद्रात बसलेल्या सरकारला तसे वाटते आहे. पण आम्ही सत्यासाठी आम्ही लढत राहू शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.
दरम्यान, मोदी आडनाव बदनामीच्या खटल्यात गुजरात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायलायने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधींचा संसदेत परतण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावताना पूर्ण विचार केला नाही. राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य योग्य नव्हते, सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगले पाहिजे, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींचे कान टोचलेत.