Thackeray Group Vs Shinde Group: शिंदे गटातील अनेक मतदारसंघ भाजपने स्वत:कडे खेचल्याने नाराजी असल्याची चर्चा आहे. सर्व्हेचे कारण पुढे करत जागा स्वत:कडे घेतल्याची शिंदे गटातून तक्रारी आल्या होत्या. काही मतदारसंघ भाजपकडे गेल्याने शिंदे गटात नाराजीचे वातावरण आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष काही महिन्यांचाच सोबती आहे. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहणार नाही. भाजपाच्या तालावरच शिंदे गटाला नाचावे लागते, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसावर आलेल्या असताना महायुतीमधील जागा वाटप तिढा, धुसफूस पूर्णपणे थांबलेली नाही. लोकसभेच्या जागा वाटपावरुन आता शिंदेंच्या शिवसेनेतच भाजप संदर्भात नाराजी सुरु झाली आहे, असा दावा अंबादास दानवे यांनी केला. भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आणि हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला ताटाखालचे मांजर करून ठेवले आहे, या शब्दांत दानवे यांनी हल्लाबोल केला.
शिवसेनेच्या जवळपास सर्व जागा फायनल झाल्या आहेत
शिवसेनेच्या जवळपास सर्व जागा फायनल झाल्या आहेत. २१ उमेदवार पूर्णपणे जाहीर झालेले आहेत. मुंबईतील काही विषय बाकी आहेत. काँग्रेस लढणार नसेल तर शिवसेना या जागा लढवणार अशा प्रकारची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली. तसेच शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे नेतृत्व करत होते, त्यावेळेस कधी भाजपाची हिंमत झाली नाही की, तुमचा उमेदवार हा असावा, असे बोलण्याची. जागावाटप हे पक्षाचे होत असते, त्यांनी त्यांचा त्यांचा उमेदवार ठरवायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असते, परंतु हे नवीनच होत आहे, असा टोला दानवेंनी लगावला.
दरम्यान, भाजपाने जे काही सर्व्हे केलेले आहेत, ते या सर्वांना बुडवण्याचे सर्व्हे आहेत. भाजपा हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नाही. शिंदे गटात जे खासदार आहे, ते उद्धव ठाकरेंनी दिलेल्या फॉर्ममुळे आहेत. भाजपाने आपल्या सर्व जागा काढून घेतल्या आहेत. इतकेच नव्हे तर भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गट यांना चारही बाजूंनी घेरले आहे. किंबहुना शिंदे गट जास्त घेरला गेला आहे. शिंदे गटाची जास्त कोंडी झाली आहे. एकनाथ शिंदे यांची प्रचंड गोची करून ठेवली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि ठाण्याची जागाही जाहीर करू शकत नाही, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला.