Shiv Sena Thackeray Group Vs MNS Raj Thackeray: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीतील काही पक्षांनी उमेदवारही जाहीर केले असून, बेबनाव कमी होताना दिसत आहे. तर, भाजपासह राज्यातील महायुती जागावाटप आणि उमेदवारांबाबत चाचपणी करताना दिसत आहेत. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे पक्षाचा लोकसभा निवडणुका लढवण्याचा मानस दिसत असून, त्यादृष्टिने बैठका, गाठीभेटी घेतल्या जात आहेत. यावरून ठाकरे गटाने टोला लगावला आहे.
मनसे पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्यासाठी तयारी करत आहे. राज ठाकरे विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. तसेच महायुतीत सहभागी होण्याविषयी चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होईल, असे नाही
राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकदा लोकसभा निवडणूक लढवलेली आहे. मागच्या वेळेस लाव रे तो व्हिडिओ सांगत काही व्हिडिओ दाखवले होते. माझ्या मते तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचार केला होता. कारण तेव्हा भाजप-शिवसेना एकत्र लढले होते. त्यांचे नेहमीच इकडे-तिकडे, तळ्यात-मळ्यात असे सुरू असते. राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होईल, असे वाटत नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत काही चर्चा सुरू आहेत. मात्र, अधिकृतरित्या कोणतेही उमेदवार आणि कोणत्याही जागा अजूनही जाहीर झालेल्या नाहीत. सर्वच ४८ जागांवर उमेदवारीसाठी चाचपणी आम्हीही केली आहे. त्यामुळे सर्व ४८ जागांवर आमचेही उमेदवार तयार आहेत. पण अधिकृतरित्या जागावाटप आणि उमेदवारी निश्चित झालेली नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.