Thackeray Group Vs Shinde Group: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार तयारीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे राज्यातील काही ठिकाणी दौरे करत आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरू आहेत. निर्धार सभेचे हिंगोलीत आयोजन करण्यात आले होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिवसेना शिंदे गटावर खरपूस शब्दांत हल्लाबोल केला. यावरून आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यात ट्विटरवर कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले.
टोमणे सम्राटांनी त्यांची तीच तीच रटाळ भाषणे आता थांबवावीत… खूपच सहन न होणारे दुःख असेल तर एक आत्मचरित्र लिहावे!!! पण तीच तीच कॅसेट परत परत वाजवू नये... पूर्ण भाषणात लोकांच्या कामाचा एकही शब्द नाही... नुसतं रडगाणं, टोमणे आणि टिका!! अहो, कधीतरी टिका-टोमण्यापलिकडे जाऊन एकनाथ शिंदेंकडून जनतेची कामे कशी करावीत? हे शिकण्याचे मनावर घेतलेत तर उरलेला पक्ष तरी वाचेल!!!, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली. याला ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी प्रत्युत्तर दिले.
अयोध्या पोळ यांचे शीतल म्हात्रेंना उत्तर
आमच्या शितलूताईला कालची सभा खूपच झोंबलेली दिसत आहे. बरनॉल लाव शितलूताई जरा म्हणजे थंडावा मिळेल, असे ट्विट अयोध्या पोळ यांनी केले. तसेच जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतंय लय भारी, अशी परिस्थिती सध्या आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्धार सभेत केली.
दरम्यान, शेतकऱ्यांना व ग्राहकांनाही योग्य भाव मिळवून देणे सरकारचे काम. मात्र, सरकारने कांदा उत्पादकांना छळले. तीच गत इतर मालांचीही आहे. एका अधिकाऱ्याने शेतकऱ्यांचा सर्व्हे केला. तेव्हा मराठवाड्यात १ लाखावर शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आढळले. चांगले नेते तयार करण्याची ताकद भाजपमध्ये नाही. त्यांना नेते, कार्यकर्ते चोरावे लागतात. दिल्लीच्या वडिलांची किंमत राहिली नाही म्हणून माझे वडील चोरावे लागतात. इतर पक्षांतून नेते मागविणार असाल तर ही नामर्दानगी आहे, अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.