Uddhav Thackeray News: कोकणाचा आशीर्वाद घेऊनच मी महाराष्ट्र फिरतोय. शिवसेना आणि कोकण हे नाते घट्ट आहे. मी माझ्या महाराष्ट्रासाठी काम करत होतो, म्हणून ‘भाडोत्री जनता पक्षा’ने आपले सरकार गद्दारी करून पाडले. भाजपच्या हिंदुत्वामध्ये शिव्या आहेत, आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत. आता म्हणतात की, विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार! मग १० वर्ष काय करत होतात, असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्यातील ठिकठिकाणी दौऱ्यावर आहेत. कोकण भेटीत गुहागर येथे जनसंवाद सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. भाजपचा ४०० पारचा डाव फक्त देशाची घटना बदलण्यासाठी आहे. घटना बदलून ते आपल्यावर हुकूमशाही लादणार आहेत. अधिकाऱ्यांना सांगतो, माझ्या शिवसैनिकांना विनाकारण त्रास द्याल, तर आमचे सरकार आल्यावर कायद्याचे फटके काय असतात हे तुम्हाला दाखवेन, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिला.
मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण मला ते पद स्वीकारावे लागले
मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. पण मला ते पद स्वीकारावे लागले. ज्यांनी तुम्हाला मोठे केले, तुमच्या मुलाबाळांची काळजी वाहिली, एखादे पद स्वीकारले तर काय झाले. शिवसेना ही चार अक्षरे त्यांच्या पाठी लागली नसती, तर तुम्ही त्यांना विचारले असते का, त्यांच्या शिवीगाळीला तुम्ही शिवीगाळ करून उत्तर देऊ नका. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या, त्यांच्या हिंदुत्वामध्ये शिव्या आहेत. भाजपचे नासलेले, कुजलेल हिंदुत्व आहे. माझा एकही शिवसैनिक पंतप्रधान मोदींना अपशब्द वापरून त्यांच्यावर टीका करत नाही, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, मासेमारी करायला गुजरातच्या बोटी येत आहे. सगळे गुजरातला नेत आहेत. मला गुजरातबद्दल राग नाही. गुजराती बांधवांच्या मदतीसाठीदेखील शिवसैनिक धावून जातो. वादळात मोदी इकडे फिरकले नाहीत. केंद्राने मदत केली नाही. आम्ही खरे हिंदू आहोत. विदर्भात आपली लाट असून मोदी सरकारची वाट लागणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्ष, तर आताचा भाडोत्री जनता पक्ष झाला असून, भाजपने भ्रष्टाचारी अभय योजना काढली, ही मोदी गॅरंटी आहे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.