Maharashtra Politics: एकीकडे राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, दुसरीकडे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर पक्षाला पडलेले भगदाड सावरण्यासाठी ठाकरे गटाचे नेते संघर्ष करताना दिसत आहेत. शिवसंवाद, शिवगर्जना अशा यात्रा-मेळाव्यातून पुन्हा एकदा पक्ष बांधणी आणि पक्ष उभारणीचे काम सुरू असलेले दिसत आहे. याच एका मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला.
शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आम्ही संपर्क करतो आहोत , असे त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे म्हणजे राम आणि श्याम आहेत असे वक्तव्य ओवैसी यांनी केले होतं. त्यावर बोलताना, ओवैसी काय म्हणतात ते मला महत्त्वाचे वाटत नाही. पक्षात असताना ते राम आणि श्यामच होते. पण ते नाते कुणी बिघडवले हे सगळ्यांना माहिती आहे असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरेंना मंत्री केले आणि एकनाथ शिंदेंच्या पोटात दुखू लागले
उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मुलगा आहे म्हणून तिकीट दिले नाही. आदित्य ठाकरेंनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. त्यांनी किती कष्ट घेतले ते आम्हाला माहिती आहे. सर्वांच्या आग्रहाखातर आदित्य ठाकरेंना तिकीट देण्यात आले. त्यानंतरही आदित्य ठाकरेंनी जे काम केले त्यामुळेच त्यांना मंत्रीपद दिले. आदित्य ठाकरेंना मंत्री केले आणि एकनाथ शिंदेंच्या पोटात दुखू लागले. आदित्य ठाकरे हे चाणाक्ष आहेत, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
दरम्यान, आनंद दिघे यांच्याविषयी आमच्या मनात खूप आदर आहे. आम्ही जवळून आनंद दिघेंना पाहिले आहे. दोन-तीन निवडणुका त्यांच्यासोबत आम्ही काम केले आहे. मात्र आनंद दिघेंचे नाव घेऊन, आनंद दिघेंच्या आयुष्यात न घडलेल्या गोष्टी सिनेमातून दाखवल्या गेल्या. उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या त्यामुळेच इंटरव्हलनंतर उद्धव ठाकरे उठून गेले, असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"