“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 07:04 PM2024-09-19T19:04:27+5:302024-09-19T19:07:45+5:30

Shiv Sena Thackeray Group News: एकीकडे महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे, ठाकरे गटाने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

thackeray group kishori pednekar warns congress that we will fight maharashtra assembly election 2024 on 288 seats and not keep silent | “...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले

“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले

Shiv Sena Thackeray Group News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी बैठका, सभा यावर आता भर दिला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा टक्कर देण्यासाठी  बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती, राजरत्न आंबेडकर, राजू शेट्टी यांच्यासारख्या इतर छोट्यामोठ्या संघटनांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीबाबत चर्चेला सुरूवात केली आहे. जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाने काँग्रेसला आम्ही २८८ जागांवर लढू शकतो, असे ठणकावून सांगितले आहे. 

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीत १२० जागांवर एकमत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी चंद्रपुरातील सर्व ६ जागा लढवणार असल्याचे म्हटले होते. याला मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. 

...तर आम्ही २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरू केलेली आहे. या निमित्ताने किशोरी पेडणेकर चंद्रपूर दौऱ्यावर होत्या. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी धोटे यांना उत्तर दिले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या तिकिटासाठी उद्धव ठाकरे यांनी किल्ला लढविल्याची आठवण किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेस नेत्यांना यावेळी करुन दिली. महायुतीचा भाग असताना चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेला जागा होत्या आणि आता तर मिळाल्याच पाहिजेत, अशी आग्रही मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली. तसेच आमचा जिल्हाप्रमुख काम करतो, आमचाही ए, बी, सी सर्व्हे झालेला आहे. त्या सर्व्हेमध्ये काही गोष्टींचा निश्चित विचार होईल. अशा पद्धतीने कोण शड्डू ठोकत असेल तर २८८ जागा आम्ही लढू, गप्प राहणार नाही, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला.

दरम्यान, आम्ही स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरु केलेली आहे. जिल्हाप्रमुख अशा पद्धतीने शड्डू ठोकत असतील तर त्याला मान्यता नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ यांचा मिळून जो काही निर्णय होईल तो होईल. परंतु, अशा पद्धतीने होत असेल तर आम्ही ऐकणार नाही. जिल्हाप्रमुख आवाज करत असेल तर प्रतिभाताई धानोरकरांना निवडून देताना आणि उमेदवारी जाहीर करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान आहे, हे विसरु नका, असे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. 
 

Web Title: thackeray group kishori pednekar warns congress that we will fight maharashtra assembly election 2024 on 288 seats and not keep silent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.