राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज ते भाजपात प्रवेश करत आहेत. मी माझ्या नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात करतोय. मी रितसर भाजपात प्रवेश करणार आहे असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षप्रवेशापूर्वी अशोक चव्हाण म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश होतोय. माझ्या नव्या राजकीय आयुष्याची ही सुरुवात आहे. मी कुणालाही निमंत्रित केले नाही. मी कुठल्याही कामासाठी घरातून निघताना पूजा करतो. हे नित्यनियम आहे. काँग्रेसचा विषय संपला आहे. आता नवीन सुरुवात होतेय असं त्यांनी म्हटलं.
अशोक चव्हाण यांच्या या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांचा प्रवेश होत असताना काही काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्यासोबत बोटावर मोजण्याइतके लोक आहेत. भाजपाची ताकद कमी झालेली आहे, त्यामुळे लोक फोडण्याचा काम सुरू आहे. भाजपाचे टार्गेट फक्त लोकसभा आहे. लोकसभेला सर्वांचा वापर करून त्यांना आपल्या घरी पाठवतील, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता, कोणाचे ऐकायचे नाही, मनाचे करायचे असे चालले होते. पक्ष जिंकावा यासाठीचे कोणतेही नियोजन होत नव्हते, या शब्दात माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त केली. काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.
प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे ऐकून पुढे जायचे असते. लोकसभेची लढाई आपण जिंकणार कशी, असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला होता. त्या दृष्टीने चर्चा, अंमलबजावणी होत नव्हती. राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हते. आताची वेळ ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची, लोकांचे प्रश्न तडीस लावण्याची असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण वगैरे चालले होते. या सगळ्या कार्यशैलीबद्दल मी बोललो, सूचना केल्या पण त्यांची दखल घेतली गेली नाही. शेवटी किती वाट पहायची? टीमवर्क दिसत नव्हते, असं अशोक चव्हाण 'लोकमत'शी संवाद साधताना म्हणाले.