Ambadas Danve: राज्याच्या राजकारणात भारत राष्ट्र समितीने शिरकाव केला असून प्रमुख पक्षातील अनेक आजी-माजी नेते सध्या बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष राष्ट्रीय राजकारणात आणला असून विविध राज्यांत तो पसरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. बीआरएस पक्षाने आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच ठाकरे गटाकडूनही यावर भाष्य करण्यात आले आहे.
भाजपत पंकजा मुंडेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असे वक्तव्य बीआरएस नेत्याने केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम हे सगळे करत असल्याचा आरोपही बीआरएसकडून होत आहे. यानंतर आता भाजपसह अन्य पक्षातील नेतेही यावर प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. पंकजा मुंडे ही ऑफर स्वीकारून बीआरएसमध्ये जातील का? असा प्रश्न अंबादास दानवे यांना विचारण्यात आला.
पंकजा मुंडे मोठ्या नेत्या, आज ना उद्या...
पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. मी त्यांना काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्या आज नाही तर उद्या नेतृत्व करतील. त्या भाजपत आत्ताही नेतृत्व करत आहेत आणि आतापर्यंत नेतृत्व करत आल्या आहेत. परंतु एखादे पद मिळाले नाही म्हणून नेतृत्व नाही असे कोणी सांगितले, असे दानवे म्हणाले.
दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून आहे. त्यामुळे बीआरएसने पंकजा मुंडे यांनी पक्षात येण्याची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे बीआरएस पक्षात आल्या तर आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करू, अशी ऑफर बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्र समन्वयकांनी दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत.