Thackeray Group Bhaskar Jadhav News: शिंदे गटात जे खासदार आहे, ते उद्धव ठाकरेंनी दिलेल्या फॉर्ममुळे आहेत. भाजपाने आपल्या सर्व जागा काढून घेतल्या आहेत. इतकेच नव्हे तर भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गट यांना चारही बाजूंनी घेरले आहे. किंबहुना शिंदे गट जास्त घेरला गेला आहे. शिंदे गटाची जास्त कोंडी झाली आहे. एकनाथ शिंदे यांची प्रचंड गोची करून ठेवली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि ठाण्याची जागाही जाहीर करू शकत नाही, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला.
भाजपाने जे काही सर्व्हे केलेले आहेत, ते या सर्वांना बुडवण्याचे सर्व्हे आहेत. भाजपा हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नाही. भावना गवळी यांनी तर दिल्लीत जाऊन राखी बांधली होती. उमेदवारी नाकारण्याचे रिटर्न गिफ्ट दिले, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. मागील निवडणुकीत शिवसेना २३ जागांवर लढली होती. त्यापैकी १८ जागांवर उमेदवार निवडून आले. शिवसेनेने निवडून आलेल्या जागांपैकी कोल्हापूर, रामटेक, अमरावती या जागा सोडल्या. महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने मोठा त्याग केला आहे. त्याची नोंद महाविकास आघाडीकडे असेल, असे मी समजतो, असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
काँग्रेसला आम्ही निवडून आलेली जागा दिली, मैत्री पूर्ण झाली आता लढत द्या
मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव असला तरी त्यावर आमचे नेते निर्णय घेतील. उद्धव ठाकरे यांचे एक विधान मी ऐकले. मैत्री पूर्ण आणि लढत, याचा अर्थ मैत्री पूर्ण होते, संपते आणि लढतीला सुरुवात होते. आम्ही निवडून आलेल्या जागा काँग्रेसला दिलेल्या आहेत. रामटेकची जागाही त्यांना दिलेली आहे. महाराष्ट्रात एका ठिकाणी कुठे गडबड झाली, तर बाकीच्या ठिकाणी त्याचे परिणाम होऊ शकतात, याची नक्की जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला.
दरम्यान, श्रीकांत शिंदे यंदा दिल्लीत जाणार नाहीत. वैशाली दरेकर या सामान्य गृहिणी, सामान्य शिवसैनिक असून, गुंडगिरी, पैशांची मस्ती, अहंकार, गद्दारी यांचा पराभव १०० टक्के करणार आहेत. समोर कितीही बलदंड असो. आम्ही तुमचा पराभव करू. आम्ही नारायण राणे यांचाही पराभव केला आहे. महाराष्ट्रातील मोठमोठे लोक निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांच्यासमोर हे बच्चा आहेत. हिंमत असेल तर आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करा, असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंना दिले.