Maharashtra Politics: भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. याचा राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शाईफेकीच्या घटनेचा निषेध केला असला, तरी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्रही सोडले आहे. यातच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, शाई कुठे वापरायची याचे भान पाहिजे, असे म्हटले आहे.
आमच्या घामाच्या पैशातून योजना निर्माण होतात. या योजनांवर तुम्ही श्रेयवादाच राजकारण करण्याची काही गरज नाही. हे लोकांचे पैसे लोकांच्या सोयीसाठीचे आहेत. लोकांसाठी वापरले गेले आहेत. तुम्ही कर्म धर्म संयोगाने त्या खुर्चीवर आहात. याचा अर्थ तुम्ही भाग्यविधाता असल्याचं थाटात वावरायचे काही कारण नाही, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाचा निषेध संसदीय मार्गाने केला आहे, असेही त्या म्हणाल्या.
भाजपची विचारधारा हरविण्यासाठी प्रयत्न करेन
चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य प्रचंड दुर्दैवी आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या अखित्यारीत असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधन प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. यावर चंद्रकांत पाटील यांनी माझ्याशी चर्चा केली. दोन घटना वेगवेगळ्या ठेवा. समितीबाबत काही बोललेलो नाही. तुमच्या कामाबाबतही काही बोललेलो नाही. तुम्ही राजीनामा का देत आहेत, तो देऊ नका, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली. मात्र, मी माझा निषेध संसदीय पद्धतीने व्यक्त केला आहे. शाई कुठे वापरायची याचे भान मला आले पाहिजे. ती शाई किती जास्त बोटांना लागते याचा विचार करेन. भाजपची विचारधारा हरविण्यासाठी बॅलेट बॉक्समधून ती शाई कशी वापरता येईल. यासाठी प्रयत्न करेन, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महापुरुषांचा अवमान करणारी विचारधारा पराभूत केली पाहिजे. रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतीचा मार्ग हा बॅलेट बॉक्समधून जातो. त्यातून ती शाई वापरली गेली पाहिजे. भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान केला जातो. यावर उपमुख्यमंत्री चकार शब्दाने बोलत नाहीत. निंदाजनक प्रस्ताव मांडायला हवा होता. पण, असे करण्यात आलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सर्व महापुरुषांचा ठरवून अवमान केला जातो, असा मोठा आरोप करत, राज्यपाल कोश्यारी कशाच्या आधारावर बोलत होते. प्रसाद लाड किंवा मंगलप्रभात लोढा कशाच्या आधारावर बोलत होते. ही सर्व मंडळी भाजपचीच का आहे, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"