Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता एका कार्यक्रमात सभेला संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अचानक अश्रू अनावर झाले. या कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित होते.
शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना सुषमा अंधारेंनी पवारांनी कशी मदत केली याचा एक किस्सा सांगितला. हे सांगताना त्या भावनिक झाल्या. सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले. माझे चुकत असेल तर तुम्ही कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे. कारण तुमच्याकडे हक्काने बोललेच पाहिजे. शरद पवारांना लोक आधारवड म्हणतात. त्यांनी राजीनामा दिल्यावर जे पत्र लिहिले होते तेच मी वाचणार आहे. संजय राऊतांनी या पत्राची प्रिंट काढून पवारांना दिल्याचे सांगितले गेले. मात्र, हे पत्र पुन्हा एकदा वाचून दाखवले पाहिजे. शरद पवार यांचा राजीनामा नको होतो, म्हणून हे पत्र लिहिले होते, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणे गरजेचे आहे
इथे राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणे गरजेचे आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
शरद पवारांमुळे माझे संपूर्ण कुटुंब सुरक्षित दिसते आहे
सभागृहात सांगू शकणार नाही की, शरद पवारांनी माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेल्या मुलीसाठी काय केले आणि काय नाही. शरद पवारांमुळे माझे संपूर्ण कुटुंब सुरक्षित दिसते आहे. अनेक नेत्यांनी चार चार महिन्यांनी माझे मेसेज बघितले. मात्र, मी शरद पवारांना मेसेज केल्यावर त्यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी अगदी मोठ्या भावासारखा फोन केला. शरद पवारांपर्यंत माहिती पोहोचवली. माझ्या एका फोननंतर पुढील ६ तासात दिल्लीत शरद पवारांसमोर हजर होते, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.