Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून तापले आहे. शरद पवारांनी आधी केलेली निवृत्तीची घोषणा आणि नंतर निर्णय मागे घेणे यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळाले. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक निवडणुकीच्या एका रॅलीला बोलताना, मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतच असतो. कसा येतो हे तुम्हाला माहीत आहे, असे विधान केले होते. यावर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस पुन्हा येईन म्हटले होते. एकदा विरोधी पक्षनेते म्हणून आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून आले. फडणवीस यांच्या विरोधात दिल्लीश्वरांचा गट इथे सक्रिय आहे. त्यामुळे फडणवीस पुढील काळात येतील पण विरोधी पक्षांचे नेते म्हणून, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
११ ते १३ मे दरम्यान काय होईल सांगता येणार नाही
अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांकडे डिनर डिप्लोमसीला जाऊन आले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. या घडामोडीतून बरेच राजकीय संकेत येत आहेत. येत्या ११ ते १३ मे दरम्यान राज्यात काय होईल ते सांगता येणार नाही. डिनर डिप्लोमसीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धक्का लागला तरी आश्चर्य वाटणार नाही, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फडणवीसांच्या उठाठेवीमुळे पक्षाची इमेज खराब झाली आहे. एकनाथ शिंदेशी हातमिळवणी केल्यामुळे पक्षांची इमेज खराब झाली आहे, असा दावा अंधारे यांनी केला.