मुंबई - केलेल्या पापातून कुठेतरी मुक्तता मिळावी. सातत्याने बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन त्यांनी केलेले पापानं मन खात असावं. तुमच्या सुपुत्राला आम्ही मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचलं हे आम्ही पाप केले. त्याबद्दल ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन नाक घासत असावेत. त्याशिवाय त्यांच्याकडे श्रद्धा नाही, प्रेम नाही आणि आस्था नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यासाठी भाजपा-शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. तत्पूर्वी मोदी मुंबई येण्याअगोदर शिंदे गटातील नेत्यांनी दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले त्यावरून भास्कर जाधवांनी टीकास्त्र सोडलं. भास्कर जाधव म्हणाले की, मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढलेत. त्यात ते आता मुंबईत येतायेत याचा अर्थ मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. ज्या राज्यात, ज्या भागात निवडणुका असतात त्या डोळ्यासमोर ठेवूनच मोदी तिथे जातात अन्यथा इतर कधी ते जाताना दिसत नाहीत असा आरोप जाधवांनी केला.
तसेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ही राजधानी कोरोना काळात संकटात सापडली होती तेव्हा मोदी मुंबईत आले नाहीत. विशेष काळजी घेताना दिसले नाहीत. परंतु पूर्वी सत्तेत असणाऱ्यांनी केलेले महापालिका उपक्रम, चांगली कामे उद्धाटन, भूमिपूजन करायचे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषण करायचं ही मोदींची खासियत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यातून मुंबई आणि महाराष्ट्राला काही मिळणार नाही असा आरोपही भास्कर जाधवांनी केला.
मुंबई महापालिका हातातून जाणार, शिंदे गटाचा दावाज्या रस्त्याच्या निविदा निघाल्या नाहीत. कामाला सुरूवात झाली नाही. त्यात भ्रष्टाचार होतो? नेमका भ्रष्टाचार कधी होतो हे आदित्य ठाकरेंना समजणं गरजेचे आहे. आदित्य ठाकरेंना स्वप्न कसं पडलं हे माहिती नाही. ही मुंबई महापालिका आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे असा दावा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केला आहे.
भरत गोगावले म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ४५० किमी रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे होणार आहेत. मागच्या सत्ताधाऱ्यांना का सुचलं नाही हे माहिती नाही. मुंबईतील रस्ते आता चांगले होतील. त्याचे श्रेय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल. आपण काही करू शकलो नाही. त्यामुळे टीकाटीप्पणी करायची म्हणून करतात असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. तसेच पायाभरणी केली त्याचं उदाहरण दाखवा. तुमच्यात धमक नव्हती म्हणून कामे केली नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहेत म्हणून कामे देऊन टाकली. आमचा नाद करायचा नाही. तुम्ही काही करू शकले नाही हे मान्य करा. आम्ही चुकलो तर ते सांगा पण चुकलो नसेल तर तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. वर्षोनुवर्षे महापालिका ताब्यात असूनही सुशोभिकरण, रस्ते कॉक्रिंटीकरण दिसले नाही का? असा सवालही गोगावले यांनी विचारला आहे.