Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यानंतर ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आगामी कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत ठाकरे गटाला आताचे नाव आणि चिन्ह वापरता येणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
निवडणूक आयोगाचा निकाल निश्चितपणे महाराष्ट्राला कुणाला पटलेला नाही. तथ्यांच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय घेणे अपेक्षित होते. भाजपने निवडणूक आयोगावर कब्जा केला आहे. जर अशा पद्धतीने भाजप निर्णय घेत असेल आणि हा निर्णय घेताना एकनाथ शिंदेचा कळसूत्री बाहुलीसारखी वापर होत असेल तर हे एकनाथ शिंदे यांनी ठरवले पाहिजे की, आपण असे वागावे का? एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण हा देवेंद्र फडणवीस आणि टीम भाजपकडे गहाण ठेवलेला आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यातच कणकवलीचे शिवसेना ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देताना याची जाणीव होती, असे म्हटले आहे.
पक्षाचे चिन्ह जाणार ही जाणीव शिवसैनिकांना होती
गेल्या २० जूननंतर हा निर्णय होणार होता, याची जाणीव होती. अंधेरीची निवडणूकदेखील आम्ही मोठ्या फरकाने जिंकणार होतो. त्यामुळे पक्ष, पक्षाचे चिन्ह जाणार ही जाणीव शिवसैनिकांना अनेक दिवसांपासून होती. शिवसैनिकांची मानसिकताही होती, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली. मंत्री, आमदार अनेक पक्षातून आले. आमदार झालो तर घाम गाळला म्हणून नाही तर माझ्याआधी अनेक शिवसैनिकांनी घाम गाळला म्हणून आम्ही आहोत. ज्यांनी आम्हाला निवडून दिले, ते जागेवरच आहेत. त्यामुळे हेच शिवसैनिक आम्हाला पुन्हा निवडून देतील. आमची ताकद म्हणून उभे राहतील, असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"