Mla Disqualification Case Result: अवघ्या काही तासांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालाचे वाचन करणार आहेत. मात्र त्यापूर्वी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर शाब्दिक हल्ले करणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, अशी अपेक्षा नाही, असे विधान केले आहे.
मीडियाशी बोलताना अरविंद सावंत यांनी केलेल्या अशा विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बोलले जात आहे. आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याबाजूने लागेल अशी अपेक्षाच नाही. कारण विकाऊ, लाचार लोक बसलेले आहेत. लाचारांकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा बाळगणे, मुर्खपणाचे लक्षण ठरेल, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल
अध्यक्ष हे सरड्याप्रमाणे रंग बदलत आहेत. त्यांनी तीनवेळा आपला रंग बदलला आहे. ते काय न्याय देणार? ज्यांनी न्याय द्यायचा, ते आरोपीला जाऊन भेटतात. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लवाद म्हणून नेमले आहे. असे असून तुम्ही आरोपीच्या घरी कसे जाता, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. जर निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. अपात्रता प्रकरणाचा निकाल काही येऊ द्यात. जनता यांना यांची जागा दाखवणार. खरे आपत्र कोण हे जनतेच्या न्यायालयात कळेल, या शब्दांत अरविंद सावंत यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली म्हणजे आकाश कोसळले, असे मानण्याचे कारण काय? आपली बाजू लंगडी आहे असे वाटते त्यांनी मतप्रदर्शन करून खोटी सहानुभूती मिळवणे बंद करावे, अशी टीका शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसेच विधानसभा अध्यक्षांनी आरोपींना भेटणे चुकीचे आहे, असे भाष्य उद्धव ठाकरेंनी करणे चुकीचे आहे. या भेटीत कोणतीही लपवाछपवी नाही. ज्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे, त्यांच्यावर दुसरा व्हिप लागू होत नाही. ज्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे, त्यांना कोणत्याही पक्षात विलीन होण्याची गरज नाही. ठाकरे गटाचे अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहेत, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.