“एकनाथ शिंदे असो वा अजित पवार भाजप लिहून देईल, तसे बोलतात”; संजय राऊतांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 02:50 PM2023-08-28T14:50:08+5:302023-08-28T14:53:04+5:30
Sanjay Raut: द्वेषाच्या भाषणाशिवाय काय आहे? लोकांमध्ये भांडणे लावली जात आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला.
Sanjay Raut: इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. महाविकास आघाडीकडून या बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना संजय राऊत यांनी अजित पवार गटावर टीका करताना गंभीर स्वरुपाचे आरोप केले. शरद पवार यांच्याविरोधात भाजप लिहून देईल, तसे अजित पवार बोलतात, असा दावा संजय राऊत यांनी केला.
एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो ते भाजपच्या लिखित अजेंड्यावर काम करत आहेत. त्यांच्या तोंडी वाक्य टाकली जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही बोलायचे असेल तर त्यांना लिहून दिले जाते. शरद पवार यांच्या विरोधात काही बोलायचे असेल, लिहायचे असेल तर तेही त्यांना लिहून दिले जाते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
लोकांमध्ये भांडणे लावली जात आहेत
आम्ही फुले-आंबेडकर यांची विचारधारा घेऊन जात असल्याचे अजित पवार सांगत आहेत. त्यावर बोलताना, फुले-आंबेडकरांचे विचार कुठे आहेत? द्वेषाच्या भाषणाशिवाय काय आहे? लोकांमध्ये भांडणे लावली जात आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा घेऊन जात असल्याचे अजितदादा म्हणत आहेत. भाजपमध्ये ती विचारधारा कुठे आहे? आपल्या गटासोबत जे जे आले त्यांना शंभर कोटींचा निधी आणि त्यांचाच विकास ते करत आहेत. बाकीच्या आमदारांना तुम्ही कवडी देत नाही. हा कुठला विकास आहे?, अशी विचारणा संजय राऊत यांनी केला आहे. २०२४ नंतर तुम्ही कोणाचे नेतृत्व स्वीकारणार? २०२४ नंतर या देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, मुंबईत होणाऱ्या बैठकीचे आयोजन उद्धव ठाकरे करणार आहेत. इंडिया आघाडीचे चिन्ह हे सर्वांसाठी प्रेरणादायी असणार आहे. या चिन्हाचे ३१ ऑगस्टला ग्रँड हयातला अनावरण होणार आहे. त्यामुळे आता आमच्यावर घाव घालणे किंवा आरोप करणे सगळ्यांनाच महागात पडणार आहे. या चिन्हामध्ये सर्वांना बांधून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. याशिवाय पूर्वेकडील काही राज्यांमधील पक्ष या आघाडीमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.