Maharashtra Politics: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केल्याने देशभरात गदारोळ सुरु आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा निषेध म्हणून शिंदे गट आणि भाजप ‘सावरकर गौरव यात्रा’ काढत आहेत. तर, महाविकास आघाडीने वज्रमूठ सभा घेतली. या सभेत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप, केंद्रातील मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सभेला उपस्थित नव्हते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मविआच्या सभेतील गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार नाना पटोले या सभेला हजर राहणार होते. मात्र, सभेच्या काही वेळ आधी नाना पटोले सभेला हजर राहणार नसल्याचे समोर आले. त्यासाठी नाना पटोलेंच्या प्रकृतीचे कारण देण्यात आले होते. यावर आता संजय राऊत यांनी खुलासा केला. ते मीडियाशी बोलत होते.
नाना पटोलेंची प्रकृती बरी नाही
संजय राऊत म्हणाले की, राज्यभरात मविआच्या सभा घेण्याचे एक वेळापत्रक ठरलेले आहे. पुढे पाहू काय होते. पण ही सभा अत्यंत उत्तम रीतीने पार पडली. नाना पटोले उपस्थित नव्हते हे खरे आहे. पण नाना पटोलेंची प्रकृती बरी नाही. तुम्ही त्यांना आत्ताही फोन केला, तरी त्यांच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की त्यांची प्रकृती बरी नाही. सभेला ते येण्याच्या तयारीत होते. पण ते मुंबईतल्या निवासस्थानी दिवसभर झोपूनच होते. मला त्यांच्याशी बोलतानाही जाणवलं की ते आजारी आहेत. या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात होते. हे सगळे काँग्रेसचेच प्रतिनिधित्व करत होते. असे नाही की काँग्रेस नव्हती. काँग्रेसचे अनेक नेते व्यासपीठावर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचेही सगळे प्रमुख नेते होते. शिवसेनेचे प्रमुख नेते होते. पुढच्या सभेला नाना पटोले नक्कीच असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मविआच्या सभेला प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन गैरहजर राहिलेले नाना पटोले गुजरातमध्ये राहुल गांधींसमवेत दिसणार असल्याचे सांगितले जात आहेत. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला नाना पटोलेंचीही उपस्थिती असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मविआच्या सभेलाच मग नाना पटोले गैरहजर का होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"