Sanjay Raut Criticised Rahul Narvekar: शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ३९ समर्थक आमदारांना नोटिसा जारी केल्या असून, दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करत, शिवसेना ही कागदावर नाही, तर रस्त्यावर आहे, असे म्हटले आहे.
भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ८ फेब्रुवारीची तारीख दिली आहे. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. उच्च न्यायालयात गेल्यामुळे कालापव्यय होणार असल्याने सर्वोच्च न्यायालयानेच शिंदे समर्थक ३९ आमदारांना नोटिसा जारी कराव्यात, अशी मागणी सिब्बल यांनी केली. त्यानुसार या आमदारांना नोटिसा बजावून दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या संदर्भात प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला.
राहुल नार्वेकरांनी सांगून गट होत नाही
राहुल नार्वेकर म्हणाले म्हणून गट होत नाही. स्वत: नार्वेकरांनीच १० वेळा पक्ष बदलले आहेत. त्यांना काय माहिती पक्षाचा आत्मा काय असतो? १०-२० लोक फुटले आहेत. तो गट आहे. त्या गटाला कुणीतरी खोके घेऊन टिळा लावला असेल. कोणत्या गटाच्या मागे लोक जात नाहीत. लोक पक्षाच्या, विचारांच्या मागे जातात. निवडणूक आयोगाचे डोमकावळे असलेले राहुल नार्वेक यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेना पाहायला हवी होती. शिवसेना ही कागदावर नाहीये, ती रस्त्यावर आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, ठाकरे गटाच्या वतीने सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या ३९ आमदारांना प्रतिवादी केले आहे, तर गोगावले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत ठाकरे गटाचे १४ आमदार आणि विधानसभा अध्यक्षांना प्रतिवादी करण्यात आले आहे.