Maharashtra Politics: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेलेत. शिंदे गटासह भाजपचे अनेक आमदार, मंत्री अयोध्येला गेले. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अचानक अयोध्येत दाखल झाले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे ढोंग असून, त्यांना श्रीरामाचा आशिर्वाद लाभणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटनाला गेले, अशी सडकून टीका संजय राऊतांनी केली. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते अयोध्येला गेल्याचे दिसले नाही. आम्ही सातत्याने जात आहोत. तेथील मंदिरासाठीआम्ही संघर्ष केला. अयोध्येत जाणे हा एक आनंद असतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.
सुरत, गुवाहाटीला रामाची आठवण झाली नाही का?
रामाचे जे सत्य वचन आहे ते तुम्ही कुठून घेणार? तुम्हाला रामाची आठवण आता झाली. जेव्हा तुम्ही पक्ष सोडला तेव्हा तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला गेलात. तेव्हा तुम्हाला रामाची आठवण जाली नाही का? तेव्हा तुम्ही अयोध्येला गेले असते तर प्रभु श्रीरामाने असत्याच्या बाजूने कौल दिला नसता, या शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली. तसेच गेल्या ७२ तासात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सर्वत्र शेतकऱ्यांचा हाहाकार उडाला आहे. अधिवेशन संपताच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ आणि काही भूमिका घेऊ असे सरकारने सांगितले होते. पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघाले. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून तुम्ही गेला आहात, असे टीकास्त्र संजय राऊतांनी सोडले.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादावर काही बोलायचे नाही. पण गौतम अदानी प्रकरणावर जे प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्या प्रश्नाची चौकशी होणे गरजेचे आहे. सत्य समोर येणे गरजेचे असल्याची विरोधकांची मागणी असल्याचे संजय राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"