Sanjay Raut News: राज्यात फक्त फोडाफोडीचे राजकारण झाले. देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण फार दिवस चालणार नाही. तुम्ही आमच्या नादाला लागा, तुमच्या नादाला लागण्या इतपत तुम्ही मोठे नेते नाहीत. उद्धव ठाकरे यांना कुटुंब आहे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून त्यांना वारसा आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राचे दोन तुकडे करायचे आहेत. नरेंद्र मोदी खोट बोलत आहेत, त्यांचे हे खोटे बोलणे गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होणार आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी विविध विषयांवर भाष्य करताना जोरदार हल्लाबोल केला. नाशिक, दिंडोरी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. सरकारची घोषणा म्हणजे निव्वळ धुळफेक, खोटारडेपणा आहे. गुजरातच्या व्यापारी, ठेकेदारांना फायदा पोहोचवण हा निर्यातबंदी उठवण्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही. निर्यातबंदी उठवली, ते लहान देश आहेत. अफगाणिस्तान, बहरीन, मॉरिशेस हे छोटे देश आहेत. तिथे आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.
अजित पवार यांची धमकी बहाद्दर म्हणून ख्याती आहे
अजित पवार त्याच विषयावर किती वेळ बोलणार? गुळगुळीत झाले आहे. अजित पवार यांची धमकी बहाद्दर म्हणून ख्याती आहे. रोज सकाळी उठून मतदारसंघातील १० लोकांना धमक्या देतात. अशी वैचारिक विधान तुम्हाला शोभत नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला. मोदींनी हसन मुश्रीफांवर कारवाई करावी. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. या देशातले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई लढत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, नसीम खान निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, ते मुस्लिम असल्याने घटक पक्षांनी विरोध केला असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. कोणाला तिकीट द्यायचे तो संपूर्ण विषय काँग्रेसचा होता. आम्ही नसीम खान यांना विरोध केला नाही. आम्ही विरोध केला हा काँग्रेसचा दावा चुकीचा आहे. नसीम खान मुंबई काँग्रेसचे मोठे नेते आहेत. आमच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांना निवडणूक लढवायची होती. माझ्यासोबत, उद्धवजी ठाकरेंसोबत बोलणे झाले होते. त्यांना उमेदवार करू नका, असे आम्ही सांगितले नाही. हा काँग्रेसचा अंतर्गत निर्णय आहे, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.