अजित पवारांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली; "धरणामध्ये XXX पेक्षा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 11:29 AM2023-06-03T11:29:36+5:302023-06-03T11:30:13+5:30
माझ्याइतके चांगले मानसिक संतुलन कुणाचे नाही. माझ्यामुळे अनेकांचे संतुलन बिघडले आहे असा टोलाही संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. पत्रकार परिषदेत खा. श्रीकांत शिंदे यांच्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच राऊत बाजूला थुंकले. त्यावरून सगळ्यांकडून राऊतांवर टीका होऊ लागली. अजित पवारांनीहीसंजय राऊतांच्या या कृत्यावर परखड भाष्य केले. त्यानंतर आता संजय राऊत यांची अजित पवारांवर पलटवार करताना जीभ घसरली.
अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, धरणामध्ये मुंतण्यापेक्षा थुंकणे चांगले. प्रत्येकाने संयम राखला पाहिजे हे बरोबर आहे. पण ज्याचे जळते त्याला कळते. आम्ही भोगतोय, आम्ही भोगूनसुद्धा जमिनीवर उभे आहोत. आम्ही पक्षासोबत उभे आहोत. पळालो नाही. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा, संकट येतायेत म्हणून भाजपासोबत सूत जुळवण्याचा विचार करत नाही अशी टीका त्यांनी अजितदादांवर केली.
त्याचसोबत मी थुंकलो म्हणून माफी मागण्याचा प्रश्न येत नाही. असे असेल तर देशातील १३० कोटी जनतेला माफी मागावी लागेल कारण ते रोज कुठे ना कुठेतरी थुंकत असतात. मी सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही. मी राजकीय नेत्यांची नावे घेतल्यावर थुंकलो नाही. मी बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो हा फरक आहे. ज्याने महाराष्ट्राशी, शिवसेनेशी, ठाकरे कुटुंबियांशी बेईमानी केली. त्यांचे नाव घेतल्यावर माझी जीभ चावली गेली त्यातून मी थुंकलो. माझ्याइतके चांगले मानसिक संतुलन कुणाचे नाही. माझ्यामुळे अनेकांचे संतुलन बिघडले आहे असा टोलाही संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
दरम्यान, मला सुरक्षेची अजिबात गरज नाही. मी त्र्यंबकेश्वरला जातोय. सगळे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. मंदिरात जाऊन आम्ही धार्मिक विधी करून परत येऊ. ज्यांनी बेईमानी केली त्यांच्यामागे सुरक्षा आहे. मी सुरक्षेची मागणी केली नाही. ज्यांना ही सुरक्षा पाठवली त्यांना परत पाठवा असंही संजय राऊत यांनी सांगितले.