Sanjay Raut News: साईबाबांचे आशिर्वाद घेण्यासाठी शिर्डीत आलो आहे. साईबाबांचे आशिर्वाद आपल्याला नेहमीच आहे आणि महाराष्ट्रालाही आहेत. त्यांना शिर्डीतून का व कोणासाठी धावाधाव करावी लागते आहे, हे मला माहिती नाही. शिर्डीतील त्यांचा उमेदवार हा शंभर टक्के पडतो आहे. आमचे भाऊसाहेब वाकचौरे यांना साईबाबा आणि जनतेचा आशिर्वाद आहे. लोकसभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकारणातच राहणार नाहीत, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना क्लीन चिट दिली. यावर बोलताना, निवडणूक आयोग हा निवडणूक आयोग नसून भारतीय जनता पार्टीची शाखा आहे. निवडणूक आयोगाकडून निःपक्ष कामाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. केंद्रात आमचे सरकार येईल त्यानंतर या सगळ्या घटनात्मक संस्थांची फेररचना केली जाईल. खऱ्या अर्थाने संविधानाला मानणाऱ्या संस्था ज्या आधी होत्या त्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करुन घेतले जाईल, असे संजय राऊत म्हणाले.
...तर कारवाई करावी, यावर तिन्ही पक्षांचे एकमत आहे
सांगलीत विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडूक लढण्यावर ठाम असले तरी काँग्रेसने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आघाडीचा धर्म पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जर महाविकास आघाडीतील कोणताही कार्यकर्ता मविआला पाडण्याचे प्रयत्न करत असेल व भाजपाला मदत करत असेल, तर त्याच्यावर कारवाई करावी, यासाठी आमचे तिन्ही पक्षांचे एकमत आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, केसापासून नखापर्यंत फक्त खोटारडेपणा आहे आणि भष्टाचार आहे. यांनी आपल्या सत्तेच्या काळात दिल्लीत आणि महाराष्ट्रात लोकांवर इतके खोटे गुन्हे दाखल करुन त्रास दिला आहे. सत्तेत असताना फडणवीस यांनी बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केली आहे. त्यामुळे त्यांना आता भीती वाटत आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.