Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू रंगत चढत चालली आहे. उमेदवारांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये सभा आहे. चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा घेत आहेत. जवळपास १० वर्षांनी मोदी चंद्रपुरात येत आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. गेल्या १० वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे. तरीही मते मिळण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन करण्यासाठी योगींना यावे लागते. योगींनी उत्तर प्रदेशातच थांबावे. तिथे अधिक लक्ष द्यावे. उत्तर प्रदेशात भाजपाची स्थिती अतिशय बिकट आणि गंभीर आहे, हे मला माहिती आहे, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी सरकारी खर्चाने दौरे करून मते मागत आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारी तामझाम सोबत घेऊन दौरे करत आहेत. सरकारी खर्चाने करत, प्रचारसभांमध्ये सहभागी होत आहेत. मत देण्याचे आवाहन करत आहेत. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. सरकारी विमान आणि साधनसुविधांचा वापर करत पंतप्रधान पक्षासाठी मते मागत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, महाविकास आघाडीत कुणीही टोकाची भूमिका घेतलेली नाही. आघाडी किंवा युतीत असताना जागावाटपावरून नेत्यांना झुकावे लागते. मग समजूत काढली जाते. त्यातून मार्ग काढला जातो, असे संजय राऊत म्हणाले.