छत्रपती संभाजीनगर – सनातन धर्मावर आम्हाला अक्कल शिकवतायेत. एकातरी बेगडी सनातन धर्मवाल्यांनी काश्मीरातील जे अधिकारी शहीद झाले त्यांच्याविषयी सहवेदना व्यक्त केल्या का? पंतप्रधानांना ह्दय नावाची गोष्ट आहे की नाही. सनातन धर्मात मानवता येते, कुठे आहे तुमची माणुसकी? जवान देशाच्या सीमेवर मरतायेत आणि तुम्ही स्वत:वर फुले उधळतायेत. यालाच हुकुमशाही म्हणतात आणि याचविरोधात आम्ही एकत्रित येऊन इंडिया आघाडी लढतेय असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, देशाचे गृहमंत्री अमित शाह मराठवाड्यात येणार होते, म्हणून मी त्यांच्या स्वागतासाठी इथं आलो. देशातील आणि मराठवाड्यातील काही प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा करायची होती. मराठवाडा मुक्ती संग्रामाला ७५ वर्ष झाली. हा अमृतकाळ फक्त कागदावर आहे. मराठवाड्याची अवस्था काय हे पाहतोय, अमित शाहांचा दौरा आणि कॅबिनेट बैठकीला गालबोट लागू नये यासाठी जालनातील उपोषण काही करून संपवावे असे दिल्लीतून आदेश होते. जालनातील आंदोलन ऐतिहासिक होते, मुख्यमंत्री आले २ उपमुख्यमंत्री पळून गेले. याठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी यायला हवं होते, हा संपूर्ण सरकारचा प्रश्न आहे, एकटे मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाहीत. डरपोक आणि बेकायदेशीर सरकार आहे. प्रत्येक संकटापासून हे सरकार पळून जाते. तोंडाला पाने पुसली जातात असा आरोप त्यांनी केला.
हा आमचा सनातन धर्म नाही
या देशाची परिस्थिती बिकट आहे. काश्मीरात कर्नल, मेजर आणि डीएसपी यांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली, ते शहीद झाले. काश्मीर खोऱ्यात अनंतनागमध्ये ही घटना घडली. सारा देश दु:खसागरात बुडला होता. वरिष्ठ अधिकारी शहीद झाले आणि आमचे पंतप्रधान दिल्लीत पक्षाच्या कार्यालयात स्वत:वर फुले उधळून घेत होते. दिल्लीत बॉम्बस्फोट झाले होते, तिथे शिवराज पाटील गेले होते. त्यानंतर त्यांनी शर्ट बदलला होता. त्यामुळे शिवराज पाटील चाकूरकर यांना राजीनामा द्यायला लागला होता. परंतु काल देशात जवान शहीद झाले आणि पंतप्रधान, भाजपा पक्ष दिल्लीतील मुख्यालयात उत्सव साजरा करतोय, स्वत:वर फुले उधळून घेतोय हा त्यांचा सनातन धर्म आहे, हा आमचा सनातन धर्म नाही, हा त्यांचा भारत वेगळा आहे, हा आमचा भारत नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं.
त्याचसोबत हे ४ जवान शहीद झाले ते भारताचे सुपूत्र होते, नुसते राजकीय कारणासाठी इंडियाचे भारत केले म्हणून हे प्रश्न सुटणार नाहीत. हे ढोंग बंद करा. ४ जवानांचे हौताम्य हासुद्धा सनातन धर्माचा भाग होता आणि तुम्ही स्वत:वर फुले उधळून घेताय. हे सगळे प्रश्न आम्हाला देशाच्या गृहमंत्र्यांना विचारायचे होते. देशातील अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा ही त्यांची जबाबदारी होती. देशाचे जवान मरतायेत आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भाजपा कार्यालयात उपस्थित होते. देश कोणत्या दिशेने चालला आहे? अशी टीका राऊतांनी केली.
महाराष्ट्र सरकार बेकायदेशीर
महाराष्ट्रात काही वेगळे चित्र नाही, या बेकायदेशीर सरकारचा निकाल ४० दिवसांत काय ४० तासांत लागायला हवा होता. पण हे बेकायदेशीर सरकार राज्यात १ वर्षाहून अधिक काळ राज्य करतंय, बेकायदेशीर निर्णय घेतंय. महाराष्ट्राची प्रतिष्ठापणाला लावतंय, सर्वोच्च न्यायालयाने हे सरकार बेकायदेशीर आहे असे मे महिन्यात सांगितले. राज्यपालांची कार्यवाही बेकायदेशीर आहे असं म्हटलं. परंतु विधानसभेचे अध्यक्ष गेल्या ६ महिन्यांपासून सुनावणी घ्यायला तयार नाही आणि काल सुनावणी घेतली तर पुन्हा २ आठवड्यांची मुदत दिली. हे बेकायदेशीर सरकार मराठवाड्यात येत आहे. या सरकारला कुठलेही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. घेतलेले निर्णय बेकायदेशीर ठरणार आहेत. प्रशासन या सरकारवर खर्च करतंय त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब द्यावा लागेल असा इशारा राऊतांनी दिला.
‘त्या’ घोषणांचे काय झाले?
मराठवाडाच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी सरकार इथं येतंय. २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ४९ हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. त्यातील एक रुपया इथं आलाय का? लातूर असेल, उस्मानाबाद, बीड, छत्रपती संभाजीनगर काय झालंय या घोषणेचे? सव्वा लाख लोकांना दूध डेअरी प्रकल्पातून रोजगार देण्याच्या घोषणा केली होती. काय झाले त्याचे? असा सवाल राऊतांनी केला.