Sanjay Raut News: शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस तुरुंगात पाठवणार होते. नवाब मलिकांच्या बाजूच्या तुरुंगात पाठवू असे दावे केले जात होते. जवळपास चाळीस हजार कोटींचा घोटाळा होता, त्याचे काय झाले, पुरावे कुठे गेले, देवेंद्र फडणवीस यांनी गिळले का, आता क्लीन चीट दिली असेल, तर अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेवर बोलताना संजय राऊतांनी सांगितले की, त्यांनी अशा सूचना द्यायला नको. प्रकाश आंबेडकर यांची विचारसरणी बघता हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीत सामील व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. लोकशाही टिकवण्यासाठी मविआमध्ये सामील व्हायला हवे. ते जिथे जातील तिथे संविधानाची भूमिका मांडत आहे, त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. २०२४ ला परिवर्तन झाले नाही तर, शेवटची निवडणूक असेल आणि हुकुमशाही सुरू होईल. तीच भूमिका प्रकाश आंबेडकर मांडत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
कृपाशंकर सिंह यांना तुरुंगात न पाठवता तिकीट दिले, ही मोदी गॅरंटी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे. यावर बोलताना, यातले सूत्र समजून घेतले पाहिजे. अजित पवार, अशोक चव्हाण, कृपाशंकर सिंह यांना तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. कृपाशंकर सिंह यांच्यावर गैरमार्गाने संपत्ती मिळवली, असा आरोप होता. तुरुंगात न पाठवता तिकीट दिले, ही मोदी गॅरंटी आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट दिली, ही मोदी गॅरंटी आहे. अशोक चव्हाण यांना तुरुंगात न टाकता राज्यसभा दिली ही मोदी गॅरंटी आहे. ज्यांना तुरुंगात टाकायचे त्यांना उमेदवारी दिली ही मोदी गॅरंटी आहे, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, अनिल देशमुखांना ब्लॅकमेल करण्यात आले, मी याचा साक्षीदार आहे. गृहमंत्री असताना प्रतिज्ञापत्र द्यायला सांगत होते. देशमुख यांच्याकडे मोठे पुरावे आहेत. देशमुख यांच्यावर दबाव होता. नेत्याची नावे घ्या असे सांगण्यात आले होते. देशमुख झुकले नाही लढले आणि सुटले, असे संजय राऊत म्हणाले.