मुंबई - मी एकदा किरीट सोमय्यांना XXX म्हटलं, हा बोली भाषेतला शब्द आहे. तुम्ही डिक्शनरी काढून पाहा चुXX या शब्दाचा अर्थ काय? महाराष्ट्रात, यूपीत रोज वापरतात. हा शब्द असंसदीय नाही. संसदेची भाषा वेगळी आहे. आमच्यासारखे लोक जे लोकांचे नेतृत्व करतात त्यांची भाषा वेगळी असते. मी सरसकट हे शब्द वापरत नाही. ज्याला जी भाषा कळते त्याला ती वापरली जाते. विंचवाला चपलेनेच चिरडावं लागते. हाताने, फुंकर मारून मारले जात नाही असं सांगत खासदार संजय राऊतांनी शिवराळ भाषेचं समर्थन केले आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, लोकशाहीत आक्षेप घेतला जाऊ शकतो. मी शिवीगाळ करतो असं म्हटलं गेले. राज्यातील जनता मला ओळखते, गेली ४०-४५ वर्ष सातत्याने लिखाण करणारा माणूस आहे. माझ्या लिखाणात मी कधीही अशाप्रकारे भाषेचा वापर केला नाही. माझी भाषा स्पष्ट, परखड असते. संस्कृती सोडून भाषा वापरली नाही. गरजेनुसार भाषेचा टोन कमी जास्त असेल. शिवीला माझा आक्षेप नाही. संत साहित्यातही शिव्या खूप आहेत. जनाबाईंचा अभंग आहे "अरे विठया विठया। मूळ मायेच्या कारटया, तुझी रांड रंडकी झाली, जन्मसावित्री चुडा ल्याली" असे अनेक अभंग माझ्या मुखात आहे. मी संत साहित्याचासुद्धा अभ्यासक आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत नामदेव ढसाळ आणि मी अनेक वर्ष एकत्र राहिलो आहे. ढसाळांचे साहित्य वाचा, ज्याला तुम्ही विद्रोही साहित्य म्हणता. भावना, उद्रेक आहेत. विद्रोह आहे. मी त्याला शिवी म्हणत नाही. भावनांचा उद्रेक आहे. मी त्याचे समर्थन करणार नाही. माझ्या भाषेत मी कायम संयमच ठेवला. गेली २० वर्ष मी संसदेत खासदार आहे. कितीवेळा असा प्रसंग आला मी शिवीगाळ केली? मी शिव्यांचे स्पष्टीकरण देऊ शकतो. मी ३ वेळा शिवी दिलीय. निवडणूक आयोगाला दिलेली शिवी ही ठरवून दिली होती. कारण ती लोकभावना होती. ज्यापद्धतीने निवडणूक आयोगाने निकाल विकला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्यारितीने उचलून दुसऱ्याच्या हाती दिली हा लोकभावनेचा उद्रेक आहे. मी कशाला अख्खा महाराष्ट्र शिव्या घालतोय असं संजय राऊतांनी म्हटलं.
आम्ही असभ्य आहोत का? गेल्या अनेक वर्षात ३ वेळा असा प्रसंग घडला आहे. मी प्रत्येक नेत्याच्या भाषणाची उदाहरणे देऊ शकतो. गरज म्हणून त्या भाषेचा, शब्दाचा वापर करतो. याचा अर्थ आम्ही शिवराळ आहे असं होत नाही. शिवसेना ही रस्त्यावरची संघटना आहे. शिवसेनेबाबत जे घडलं त्यामुळे जी भाषा वापरतो हा विद्रोह आहे. आम्ही असभ्य आहोत का? महाराष्ट्राचे संस्कार, संस्कृती, मराठी भाषा, साहित्य आणि कला हे आम्हालाही माहिती आहे. विंचू डंस करत असेल तर त्याला चपलेनेच मारावे लागतात असंही राऊत यांनी सांगितले.
तर आम्ही सार्वजनिक जीवनात आहोत. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो शिवसेनेवर आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे. हा निकाला दबावातून दिला आहे. त्यामुळे त्यांना दिलेली भाषा योग्यच आहे. मी माझ्या शब्दावरून मागे हटत नाही. ज्याच्यावर संकट येते त्याला कळते. निवडणूक आयोग हा भ्रष्ट आयोग आहे असं लोकांना वाटते. निवडणूक आयोगाचे काम योग्यरितीने चालले नाही हे सुप्रीम कोर्टाच्याही निदर्शनास आले. ४० आमदार फुटले म्हणून अख्खा पक्ष फुटिरांच्या हातात ठेवला नसता. माझ्यादृष्टीने मी जो शब्द वापरला ते योग्यच आहे. मी घटनाबाह्य वागणाऱ्या संस्थेला शिवी दिली हा उद्रेक आहे. शिवीगाळ नाही असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिले.