INDIA Meeting In Mumbai: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या विरोधात उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी येथील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीच्या स्थळी पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. दबावामुळे इंडिया आघाडीतून कोणताही पक्ष बाहेर पडणार नाही, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. इंडिया आघाडीत २६ राजकीय पक्ष सामील आहे. त्यामुळे विरोधकांची आघाडी बळकट होताना दिसत आहे. इंडिया आघाडीतील पक्षांवर दबाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
दबावामुळे INDIA आघाडीतून कोणताही पक्ष बाहेर पडणार नाही
इंडिया आघाडीच्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजीच्या बैठकीच्या तयारीला वेग आलेला आहे. देशातील देशभक्त पक्ष एकत्र आले आहेत. भाजपकडून विरोधकांवर कारवाई सुरू आहे. २६ ते २७ देशभक्त पक्ष एकत्र आल्याने भाजपची झोप उडाली असून, त्यामुळेच ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांवर ईडी, सीबीआय कारवाया सुरू आहेत. विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही, म्हणून राजकीय विरोधकांवर खोटे खटले टाकायचे आणि त्यांच्यावर कार्यवाही करायची, असे सत्र सध्या भाजपच्या लोकांनी आरंभलेल आहे. मात्र कुठलाही पक्ष इंडिया आघाडीतून दबावामुळे बाहेर पडणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ‘इंडिया’ आघाडीची मुंबईतील ही बैठक देशाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ या नावाने एकत्र येत भाजपच्या नेतृत्वातील एनडीचा मुकाबला करण्याचा निर्धार करत ‘इंडिया जिंकणार, भाजप हरणार!’ असा ऐक्याचा बुलंद नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पाटणा, बंगळुरू येथील दोन बैठकांनंतर ‘इंडिया’ची महत्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीला सात राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्यासह देशभरातील २६ राजकीय पक्षांचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते उपस्थित राहणार आहेत.